मुंबई पालिका प्रचारापासून काँग्रेस नेतृत्व अलिप्त राहणार

मुंबई पालिका प्रचारापासून काँग्रेस नेतृत्व अलिप्त राहणार

Published on

पालिका प्रचारापासून काँग्रेस नेतृत्व अलिप्त
मुंबईत भाजपचा फायदा होऊ नये म्हणून व्यूहरचना

विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची बुधवारी (ता. २४) अधिकृत घोषणा होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे प्रचार सभांनाही मोठी रंगत येणार आहे. त्यातच भाजप या वेळी हैदराबाद पॅटर्ननुसार पक्षाचे सर्व स्टार प्रचारक मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रचाराच्या धामधुमीपासून काँग्रेस नेतृत्व मात्र अलिप्त राहणार असल्याचे कळते. भाजपचा फायदा होईल असे कोणतेही पाऊल उचलायचे नाही, हीच त्यामागील रणनीती असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची, असा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी भाजपची बूथ मॅनेजमेंट आणि भक्कम निवडणूक यंत्रणा केव्हाचीच कामाला लागली आहे. नुकत्याच झालेल्या नगर पंचायत व नगर परिषद निवडणुकांतील अभूतपूर्व यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंविरुद्ध या वेळी हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर भाजपची मोठी स्टारकास्ट मैदानात उतरणार आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या प्रचारसभा तसेच केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधान यांचे रोड शो होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे या जोडगोळीच्या भव्य सभा होणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने पालिका निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असली, तरी त्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नावांचा उल्लेख नाही. मुंबईतील दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रचारात उतरणार आहेत. उत्तर भारतीय मतदारांसाठी इम्रान प्रतापगढी, मोहम्मद अझरुद्दीन, राज बब्बर आणि कन्हैया कुमार, तर गुजराती-राजस्थानी मतदारांसाठी जिग्नेश मेवाणी आणि सचिन पायलट यांना मैदानात उतरवले जाणार आहे. मात्र मुंबई पालिकेच्या रणसंग्रामात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उतरवण्यास केंद्रीय नेतृत्व फारसे इच्छुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकाकी लढणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा दाटण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत सभा घेऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे.

अप्रत्यक्ष आघाडी धर्म पाळण्याची भूमिका
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढत असली, तरी अप्रत्यक्ष आघाडी धर्म पाळण्याची भूमिका यामागे असल्याचे कळते. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना मैदानात उतरविल्यास ठाकरे बंधूंवरील लक्ष हटू शकते. शिवाय आक्रमक प्रचार केल्यास मतांमध्ये फूट पडून भाजपचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे थेट आघाडी नसली तरी भाजपला मदत होईल असे कोणतेही पाऊल उचलायचे नाही. तसेच टोकाची टीका टाळून मनभेद व संबंध बिघडू नयेत, याची खबरदारी काँग्रेस नेतृत्व घेत आहे.
...
स्थानिक निवडणुकांमध्ये केंद्रीय नेत्यांना उतरवण्याची आमची परंपरा नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना प्रचारात उतरवण्याची आवश्यकता नाही. राज्यातील नेते सक्षम असून, तेच प्रभावीपणे ही जबाबदारी पार पाडतील.
- रमेश चेन्नीथला, प्रभारी, महाराष्ट्र काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com