पायलट होण्याचे ५ तरुणींचे स्वप्न भंगले;
खासगी अकॅडमीकडून कोटींची फसवणूक
पाच तरुणींचे पायलट होण्याचे स्वप्न भंगले
नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : आकाशात झेप घेण्याचे आणि पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पाच तरुणींचे स्वप्न खारघरमधील एका खासगी एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. परदेशात पायलट ट्रेनिंग देण्याच्या प्रलोभनातून या तरुणींकडून तब्बल दोन कोटी ३९ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, संबंधित विदेशी अकॅडमीला पूर्ण शुल्क न दिल्याने पाचही तरुणींचे पायलट प्रशिक्षण अर्धवट अवस्थेत थांबवण्यात आले. अखेर या तरुणींना अपूर्ण प्रशिक्षणावरच भारतात परतावे लागले असून, याप्रकरणी खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खारघर सेक्टर-७ येथील एसएफए अँड एटीपी अकॅडमी या खासगी एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये २०२४ ला मुंबई व नवी मुंबई परिसरातील पाच तरुणींनी प्रवेश घेतला होता. पायलट होण्याचे स्वप्न दाखवत अकॅडमीकडून त्यांना यूएई येथे प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार या पाचही तरुणींकडून एकूण रु. २,३९,००,०००/- इतकी मोठी रक्कम स्वीकारण्यात आली.
यानंतर या तरुणींना फुजैराह एव्हिएशन अकॅडमी, यूएई येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. मात्र, एसएफए अँड एटीपी अकॅडमीने संबंधित विदेशी अकॅडमीला पूर्ण प्रशिक्षण शुल्क न भरल्याने पाचही तरुणींचे पायलट ट्रेनिंग अचानक थांबवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशिक्षण बंद झाल्याने आणि अकॅडमीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर या तरुणींना अर्धवट प्रशिक्षण सोडून भारतात परतावे लागले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणींनी खारघर येथील एसएफए अँड एटीपी अकॅडमीकडे जाऊन आपली रक्कम परत मागितली. मात्र, अकॅडमीचे चालक पंकज अनिल कृष्णन, तसेच कर्मचारी वैष्णवी नायक व सेजल चौधरी यांनी पैसे परत देण्यास नकार देत उलट धमकी देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप पीडित तरुणींनी केला आहे. अखेर या तरुणींनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

