

जलसंधारणला चालना
वनराई बंधाऱ्यांमुळे विक्रमगडमध्ये पाणीसाठ्यात वाढ
विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामीण भागात जलसंधारणला विशेष महत्त्व देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून कृषी विभाग व राह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड तालुक्यात विविध गावांमध्ये वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. कऱ्हे, भानपूर, टेंभोली यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे वनराई बंधारे बांधण्यात आल्याने परिसरातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओढे, ओहळ व नाले असून, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्यासाठी वनराई बंधारे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत असून, भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होत आहे. परिणामी विहिरी, हातपंप व बोअरवेलमध्ये वर्षभर पाणी टिकून राहत आहे. जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत आहे. भाजीपाला, हरभरा यांसारख्या पिकांचे क्षेत्र वाढले असून, शेती उत्पादनातही सकारात्मक बदल दिसून येत आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे.