बागायतदारांच्या उत्त्पन्नाला कात्री

बागायतदारांच्या उत्त्पन्नाला कात्री

Published on

बागायतदारांच्या उत्त्पन्नाला कात्री
किसान रेलसेवा कोरोना काळापासून बंद, चिकूच्या वाहतुकीला फटका
पालघर, ता. २४ ः राज्यातील चिकू उत्पादनाचे पालघर जिल्हाप्रमुख केंद्र आहे. उत्तर भारतात पालघरच्या चिकूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, चिकूची वाहतूक करणारी किसान रेल कोरोना काळापासून बंद असल्याने बागायतदारांच्या उत्पन्नाला कात्री लागली आहे.
पालघर जिल्हा हा चिकू फलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चविष्ट, नाजूक, पौष्टिक फळ असल्यामुळे देशभरात चिकूला चांगली मागणी आहे. मागणी लक्षात घेता उत्तर भारतात चिकू पोहोचवण्याच्या दृष्टीने किसान रेल्वे सुरू करण्यात आली. पालघर जिल्ह्यातून रेल्वेगाडीतून येथील चिकू मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात पाठवला जात होता. स्थानिक बाजारभावाच्या तुलनेत उत्तर भारतात चिकूला चांगला दर मिळत होता. चिकू बागायतदारांसाठी चांगल्या उत्त्पन्नाचा स्रोत बनले. मात्र, कोरोनापासून किसान रेल बंद झाल्याने बागायतदारांना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
--------------------------
गुणवत्तेवर परिणाम
किसान रेल बंद असल्याने सद्यःस्थितीत चिकू रस्ते मार्गाने पोहोचवला जातो. मात्र, यामुळे बागायतदारांना तोटा होत आहे. रस्ते मार्गाने दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुळे चिकूची पत चांगली राहत नाही. किसान रेल्वेने चिकू २० तासांत पोहोचवला जात होता. त्यामुळे चिकूचे फळ चांगले राहत होते. परिणामी, भावही चांगला मिळत होता, पण रेल्वे बंद असल्यामुळे चिकूच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
़़़ः---------------------------
वाहतूक खर्चात वाढ
सरकारी योजनेमुळे चिकूवर रेल्वे मालवाहतूक शुल्क कमी होते, पण रेल्वे बंद झाल्याने दिल्ली, गुजरात, उत्तर भारतातील बाजारपेठांपर्यंत चिकू पोहोचण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्याचा फटका डहाणूसह वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी भागातील हजारो शेतकऱ्यांना बसला आहे. रेल्वे नसल्याने बागायतदारांच्या वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.
------------------------
हंगाम संकटात
- सद्यःस्थितीत हवामान बदल, कमी उत्पादनामुळे चिकूची मागणी स्थानिक पातळीवर घटली आहे. फळाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी, कर्ज फेडण्याबरोबर पुढील हंगामासाठी खर्च कसा करायचा अशी भीती बागायतदारांना आहे.
- जिल्ह्यासाठी किसान रेल तातडीने पुन्हा सुरू करावी किंवा उत्तर भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या आणि पालघर डहाणू येथे थांबा असलेल्या अशा गाड्यांना चिकू वाहतुकीसाठी किमान दोन मालडबे जोडावेत, अशी आग्रही मागणी चिकू उत्पादकांची आहे.
---------------------------
किसान रेल बंद झाल्याने पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. तातडीच्या सरकारी हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली आहे. किसान रेल सुरू करा किंवा पर्यायी रेल्वे व्यवस्था करण्याची गरज आहे.
- केतन पाटील, चिकू उत्पादक संघ, पालघर
़ः-----------------------------
किसान रेलसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे. रेल्वेबाबतची व्यवहार्यता तपासली जात आहे. रेल सुरू करण्यास प्रशासन अनुकूल आहे.
- डॉ. हेमंत सवरा, खासदार

Marathi News Esakal
www.esakal.com