अन्नसंस्कृतीतील पौष्टिक कंदमुळांचा महोत्सव

अन्नसंस्कृतीतील पौष्टिक कंदमुळांचा महोत्सव

Published on

टोकावडे, ता. २४ (बातमीदार) : आदिवासी आणि ग्रामीण अन्नसंस्कृतीचा अविभाज्य भाग आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध कंदमुळांची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी मुरबाड तालुक्यात पहिल्यांदाच ‘ट्यूबर फेस्टिव्हल’ होणार आहे. हा अनोखा महोत्सव १० जानेवारीला मुरबाड तालुक्यातील मासळे-बेलपाडा येथील अश्वमेघ भवन येथे पार पडणार आहे.
कंदमुळे म्हणजे जमिनीत नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या खाद्य वनस्पतींची मुळे, खोडे किंवा गाठी होत. आदिवासी समाजाने पिढ्यान्‌पिढ्या जतन केलेली ही अन्नसंपदा अत्यंत पौष्टिक, नैसर्गिक आणि आरोग्यदायी आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे या कंदमुळांचे महत्त्व हळूहळू दुर्लक्षित होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर कंदमुळांची विविधता, त्यांचे पोषणमूल्य आणि उपयोग याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव होणार आहे. ‘ट्यूबर फेस्टिव्हल’मध्ये ‘करांदे’, ‘गोधडी’, ‘खसर’, ‘कडू कंद’, ‘रानकेळे’, ‘कणर्क’, ‘पायकंद’, ‘अळकुडी’ आदी विविध प्रकारची कंदमुळे प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. या कंदमुळांची ओळख, त्यांचे औषधी व पौष्टिक गुणधर्म यांची माहिती देण्यात येणार आहे. कंदमुळांपासून झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार करता येणारे विविध खाद्यपदार्थ प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहेत.
महोत्सवात श्रमिक मुक्ती संघटनेच्या ॲड. इंदवी तुळपुळे या कंदमुळांचे महत्त्व, आदिवासी अन्नसंस्कृती तसेच जैवविविधतेचे संवर्धन या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. हा उपक्रम वननिकेतन, इनटेंक ठाणे चॅप्टर आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

महोत्सवाचे उद्दिष्ट
पारंपरिक आदिवासी अन्नसंस्कृतीला प्रोत्साहन देणे, कंदमुळांच्या जैवविविधतेचे संवर्धन करणे तसेच आदिवासी शेतकरी व समुदायाला आर्थिक व सामाजिक पाठबळ देणे, हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी नागरिकांना केले आहे.

एकेकाळी दुष्काळी परिस्थितीत आदिवासी समाजाच्या भुकेला आधार देणारी कडू कंदे व कवदरे (रानकेळ्याचे कंद) आज नव्या पिढीकडून हळूहळू विसरली जात आहेत. शहरी समाजापुरती कंदमुळांची ओळख मोजक्याच प्रकारांपुरती मर्यादित आहे. प्रत्यक्षात निसर्गात पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्म असलेली अनेक कंदमुळे उपलब्ध आहेत. विस्मरणात गेलेल्या या कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आस्वाद घेण्याची संधी देणे, हाच महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
- ॲड. इंदवी तुळपुळे, श्रमिक मुक्ती संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com