आचारसंहितेला नेतेमंडळीकडून बगल
आचारसंहितेला नेतेमंडळीकडून बगल
मिरा-भाईंदरमध्ये धार्मिक कार्यक्रमांमधून छुपा प्रचार
भाईंदर, ता.२४ (बातमीदार): मिरा-भाईंदरमध्ये राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांची मोर्चेबांधणी सुरू आहे. पण निवडणुकीचा प्रचार आचारसंहितेच्या कचाट्यात सापडून नये, यासाठी हळदी कुंकू, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली आहे.
महापालिका निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात राजकीय पक्षांना कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर त्याची रितसर परवानगी घ्यावी लागते. या कार्यक्रमाचा खर्च पक्षावर लावला जातो. कार्यक्रमाच्या आयोजना दरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागत असते. यासाठी राजकीय पक्षांनी यातून पळवाट शोधून काढली आहे. सध्या विविध सामाजिक संस्थांच्या नावे कार्यक्रम होत आहेत. यात हळदी कुंकू, धार्मिक कार्यक्रमांची संख्या अधिक आहे. या कार्यक्रमांना महिलांची मोठी गर्दी होत आहे. कार्यक्रमानिमित्त संस्थेकडून राजकीय नेत्यांनाही आमंत्रित केले जात आहे. यावेळी संस्थेकडून महिलांना भेट वस्तू देखील दिल्या जात आहेत.
--------------------------
आर्थिक रसद
धार्मिक कार्यक्रमांची भक्तांची गर्दी होत आहे. अशा कार्यक्रमात नेते मंडळी आवर्जून उपस्थिती लावत आहेत. एकप्रकारे आपल्या पक्षाचा प्रचार करवून घेत आहेत. यासाठी नेते मंडळींकडूनच कार्यक्रमांना आर्थिक रसद पुरवली जाते. मात्र, निवडणूक आचारसंहितेचा बडगा उगारला जाऊ नये, यासाठी कार्यक्रमांसाठी संस्थांच्या नावाचा वापर केला जात आहे.

