भाजपचा गड अबाधित राहणार का?
भाजपचा गड अबाधित राहणार का?
लॉटरीतून ठरलेला प्रभाग २२० ठरतोय महापालिकेचा कळीचा रणसंग्राम
नितीन बिनेकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : २०१७ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२० चा निकाल थेट लॉटरीने लागला होता. भाजपचे अतुल शहा विजयी ठरले आणि मुंबादेवीतील हा महत्त्वाचा प्रभाग भाजपकडे राहिला. आठ वर्षांनंतर पुन्हा पालिका निवडणुका तोंडावर असताना, हाच प्रभाग राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा हा प्रभाग यंदाही टिकणार की विरोधक धक्का देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण मुंबईतील हा प्रभाग व्यापारी आणि दाट लोकवस्तीचा आहे. मुंबादेवी मंदिर परिसर, झवेरी बाजार, पायधुनी, चाळींचे भाग आणि सुरू असलेले अनेक पुनर्विकास प्रकल्प ही त्याची ओळख. व्यापारी, लघुउद्योजक, कामगारवर्ग आणि स्थलांतरित कामगार येथे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे ५४ हजार होती, ती आता वाढलेली आहे. अल्पसंख्याक समाजासह गुजराती, मारवाडी, मराठी आणि उत्तर भारतीय मतदार येथे प्रभावी आहेत.
२०१७ चा निकाल समान मतांमुळे लॉटरीने लागला, यावरूनच या प्रभागातील राजकीय समतोल किती नाजूक आहे हे स्पष्ट होते. व्यापारीवर्गाचा भाजपकडे असलेला कल, मजबूत संघटन आणि केंद्रातील सत्तेचा प्रभाव ही भाजपची बलस्थाने मानली जातात. मात्र, लोकसभा-विधानसभा निवडणुकांत काही बूथवर विरोधकांनी चांगली मते घेतल्याने भाजपसाठी तो इशाराही आहे.
वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, पुनर्विकासातील दिरंगाई, ड्रेनेज आणि स्वच्छता हे स्थानिक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीने एकत्रित लढत दिल्यास चित्र बदलू शकते. बदलती लोकसंख्या, संभाव्य आरक्षण आणि स्थानिक नाराजी या घटकांमुळे प्रभाग २२० यंदा पुन्हा अटीतटीचा ठरण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक व्यापारी रमेश शहा म्हणाले, इथे वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न रोजचा झाला आहे. व्यापारी भाग असूनही नियोजनाचा अभाव जाणवतो. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुनर्विकास रखडल्यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य अडकले आहे. स्वच्छता आणि ड्रेनेजकडेही दुर्लक्ष होते. काम करणारा नगरसेवकच हवा, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी शबाना शेख यांनी दिली.
२०१७ पालिका निवडणुकीचा निकाल
उमेदवार- पक्ष - मिळालेली मते -निकाल
- अतुल शहा - भाजप - ५,९४६ विजयी (लॉटरीद्वारे)
- सुरेंद्र बागलकर - शिवसेना - ५,९४६ पराभूत (समान मते)
नागरिकांच्या प्रमुख समस्या
* वाहतूक कोंडी
-अरुंद रस्त्यांमुळे दिवसभर ट्रॅफिक जॅम
-व्यापारी भागात मालवाहतुकीचा गोंधळ
- पार्किंगचा ताण
- झवेरी बाजार-मुंबादेवी परिसरात अपुरी पार्किंग व्यवस्था, रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग
* रखडलेला पुनर्विकास
-जुन्या इमारतींचे प्रकल्प संथ गतीने
-रहिवासी वर्षानुवर्षे प्रतीक्षेत
* गटार-ड्रेनेज समस्या
-पावसाळ्यात पाणी साचते
-जुनी ड्रेनेज लाइन अजूनही बदललेली नाही
* स्वच्छतेचा अभाव
दाट लोकवस्तीमुळे कचरा व्यवस्थापन अपुरे, व्यापारी परिसरात दुर्गंधीची तक्रार
* फेरीवाले विरुद्ध दुकानदार
रस्त्यावर फेरीवाल्यांची वाढ, व्यापाऱ्यांमध्ये सतत संघर्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

