रेल्वे स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करा!
रेल्वे स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करा!
मुंबई रेल्वे प्रवासी संघाची मागणी
कळवा, ता. २४ (बातमीदार) : मुंबई रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचे आरोग्य रामभरोसे असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने प्रत्येक स्थानकावर सुसज्ज आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करावेत, अशी मागणी मुंबई उपनगरी रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी केली आहे. नुकताच वाशी रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी लावून धरण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी वाशी स्थानकात हर्ष पटेल या प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय सुविधा नसल्याने त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. अशीच घटना काही महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे घडली होती, जिथे नीलेश प्रभू यांना चालत्या गाडीत झटका आला. त्यांना भाईंदर स्थानकावर उतरवण्यात आले, मात्र तिथेही वैद्यकीय कक्ष नसल्याने बराच वेळ वाया गेला आणि त्यांना प्राण गमवावे लागले. या गंभीर घटनांमुळे रेल्वेच्या आरोग्य सुविधांमधील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत.
सिद्धेश देसाई यांनी २२ नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात पत्र दिले होते, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. रेल्वे स्थानकात सुसज्ज वैद्यकीय कक्ष नसल्याने प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत जीवाशी खेळावे लागत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर प्रशिक्षित डॉक्टरांसह सुसज्ज केंद्रे त्वरित सुरू करावीत, अशी आग्रही मागणी देसाई यांनी करत धावपळीच्या आयुष्यात प्रवाशांवर कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. वाशी आणि भाईंदरमधील घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी रेल्वेने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असेही म्हटले आहे.
------------------
२.२२ कोटींचा खर्च नेमका कुठे?
रेल्वे प्रशासनाने २०१६ मध्ये सुमारे २.२२ कोटी रुपये खर्च करून चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली यांसारख्या मोजक्याच स्थानकांवर सुविधा पुरवल्या आहेत. मात्र, उर्वरित शेकडो स्थानकांवर आजही प्राथमिक उपचारांची सोय नाही. काही ठिकाणी आरोग्य केंद्रे असूनही तिथे प्रशिक्षित डॉक्टर, जीवनावश्यक औषधे आणि कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दररोज ७० लाख प्रवासी प्रवास करणाऱ्या या जीवनवाहिनीवर सोयीसुविधांचा अभाव असणे ही चिंतेची बाब आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

