मलनिःसारण केंद्रातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
मलनिस्सारण केंद्रातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
खारघर, ता. २४ (बातमीदार) : खारघर सेक्टर १५ वसाहतीलगत सिडकोने उभारलेल्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून पसरणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील शालेय विद्यार्थी व रहिवासी गंभीर त्रासाला सामोरे जात आहेत. या दुर्गंधीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात मनसेचे पदाधिकारी गणेश बनकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको व पनवेल महापालिका प्रशासनाला लेखी पत्र देऊन लक्ष वेधले आहे.
सेक्टर १५, १६ आणि १८ परिसरात डीव्हीस पब्लिक स्कूल, केपीसी, व्हायब्रंटग्योर आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूल अशा नामांकित शाळा असून, सुमारे ४० हजारांहून अधिक नागरिक येथे वास्तव्यास आहेत. मलनिस्सारण केंद्राच्या काही अंतरावरच घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार व सेलिब्रेशन अशा सिडको वसाहती असल्याने दुर्गंधीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे. सकाळ व संध्याकाळी दुर्गंधी अधिक तीव्र होत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच शालेय कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती केपीसी शाळेच्या प्रशासनाने दिली आहे.
दोन वर्षांपूर्वीही याच समस्येबाबत तक्रारी झाल्यानंतर काही काळ प्रदूषणात घट झाली होती. दरम्यान, हिवाळा सुरू होताच दुर्गंधी पुन्हा वाढली असून नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
चौकट
उपाययोजनांची गरज
सिडकोच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून पसरणारी दुर्गंधी तातडीने रोखली नाही, तर शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य व नागरिकांचे दैनंदिन जीवन गंभीरपणे बाधित होण्याची भीती असून, प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

