रोटरी शाळेचा वार्षिक स्नेहसोहळा उत्साहात
रोटरी शाळेचा वार्षिक स्नेहसोहळा उत्साहात
उरण, ता. २३ (वार्ताहर) : उरण रोटरी एज्युकेशन सोसायटीच्या रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा ३६वा वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात शाळेच्या मैदानावर पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे चेअरमन विकास महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात वर्षभरातील शैक्षणिक प्रगती, क्रीडा आणि विज्ञान प्रदर्शनात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या पदाधिकारी व विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले गेले.
विशेषतः विद्यार्थिनी प्रियांशी मयूर पाटील यांना सप्टेंबर २०२५मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय विंडसर्फिंग स्पर्धेत कांस्यपदक आणि भोपाल व मध्य प्रदेश येथील स्पर्धेत रौप्य पदक मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने विकास महाजन यांनी पुष्पगुच्छ, मेडल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला.
शाळेच्या प्राचार्या अक्षता घरत यांनी शाळेचा वार्षिक अहवाल पालकांसमोर सादर केला. कार्यक्रमात रोटरी एज्युकेशन सोसायटीचे जॉइंट सेक्रेटरी शेखर म्हात्रे, खजिनदार प्रसन्नकुमार, विश्वस्त डॉ. बी. व्ही. देवणीकर, विश्वस्त नरेंद्र पडते, सदस्य राज म्हात्रे, मनीषा महाजन, पूजा म्हात्रे, सदस्य सरिता पडते तसेच पालक-शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष कैलास ठाकूर उपस्थित होते.

