सांताक्रूझ पूर्वेचा गड ठाकरे गट राखणार का?

सांताक्रूझ पूर्वेचा गड ठाकरे गट राखणार का?

Published on

सांताक्रूझ पूर्वेचा गड ठाकरे गट राखणार का?
भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८७ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ शिवसेनेचा गड आहे; मात्र माजी आमदार तृप्ती सावंत यांनी केलेल्या बंडखोरीनंतर या मतदारसंघाला तडा गेला आणि पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे आमदार झिशान सिद्दीकी आमदार म्हणून निवडून आले.
आता तब्बल आठ वर्षांनंतर पालिका निवडणूक लढवली जात आहे. त्यातच शिवसेनेेचे दोन भाग झाल्‍यानंतर पालिका निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे ठाकरे गटासमोर आव्हान असणार आहे. प्रभाग क्रमांक ८७चे दिवगंत नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर प्रभागाचे नगरसेवक होते. तेव्हा दोन्ही शिवसेना एकत्र होत्‍या. आता शिवसेना पक्ष फुटल्याने हा बालेकिल्ला राखणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघड जाणार आहे. त्यामुळे इथे दोघांमध्ये खरी चुरस पाहायला मिळणार आहे. २०१७ला प्रभाग क्रमांक ८७ मधून शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या महेश कृष्णा पारकर यांचा दोन हजार मताधिक्याने पराभव केला होता. मराठीसह मुस्लिम, उत्तर भारतीय, गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. २०१७ नंतर आताही हा ओबीसी आरक्षित प्रभाग आहे.
उत्तर मध्य मुंबईमध्ये हा प्रभाग येतो. उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आहेत. हा प्रभाग वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे इथे शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य अधिक दिसते. याचा परिणाम म्हणून शिंदे सेनेला या प्रभागासाठी जास्त ताकद लावावी लागणार आहे.
निवडणुकीत फक्त चेहराच बोलतो असे नाही तर पक्षाचे कामही बोलते. दरम्यान, २०१७ च्या पालिका निवडणुकीत अविभाजित शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून पराभूत झालेले भाजप नेते महेश पारकर यांनी पुन्हा एकदा उमेदारीसाठी दावा केला आहे.

प्रमुख समस्या
- पायाभूत सुविधा : खराब रस्ते, अपुरे पथदिवे, ड्रेनेजची समस्या, पाण्याची टंचाई
- स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन : कचरा उचलण्यात दिरंगाई, अस्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था
- जुने बांधकाम आणि पुनर्विकास : म्हाडाअंतर्गत येणाऱ्या इमारतींच्या दुरुस्ती आणि पुनर्विकासाचा प्रश्न, सुरक्षिततेचा अभाव
- वाहतूक कोंडी : अरुंद रस्ते, पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतुकीची कमतरता
- नागरिकांच्या तक्रारी : महापालिकेच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणि जलद निवारण नसणे
बेस्ट बसची अपुरी व्यवस्था ः रिक्षाचालकांची वाढलेली मुजोरी, बीकेसी परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी, अवैध झोपडपट्ट्या
..................................
वॉर्ड क्र. ८७ - वांद्रे पूर्व (पालिका) - निकाल २०१७
विजेता : विष्णू पांडुरंग महाडेश्वर (शिवसेना) - ७,२५० मते
महेश पारकर (भाजप) - ७,२१६ मते
धर्मेश व्यास (काँग्रेस) -४,९५० मत
संदीप गायकवाड (मनसे) - ७९६ मते

महाडेश्‍वरांच्या पत्‍नीला उमेदवारी?
हा प्रभाग माजी नगरसेवर विश्वनाथ महाडेश्वर यांचा बालेकिल्ला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी पूजा महाडेश्वर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यांना जरी तिकीट मिळाले तरी शिवसेना शिंदे गट फुटल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेला शिंदे शिवसेनेचा सामना करावा लागू शकतो.

भाजपला मिळणार नवा चेहरा?
महेश पारकर यांना चार वेळा उमेदवारी देऊनही विभागातील बरीचशी कामे न झाल्याने पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की सांताक्रूझ पूर्वेमध्ये भाजपला नीलेश नार्वेकर यांच्या रूपात नवा चेहरा मिळणार, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com