सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची
सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची
प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशाचा अन्वयार्थ
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे शहराचा चेहरा असलेले प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी (ता. २६) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सध्या दररोज होणारी घाऊक पक्षांतरे काही नवीन राहिलेली नाहीत, अशा वेळी दोन्ही शिवसेनेकडून आलेल्या ऑफर नाकारून पक्षात आलेल्या प्रशांत जगताप यांच्यामुळे काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा भरल्याचे चित्र दिसून आले.
२६ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेले प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला आहे. जगताप यांच्या प्रवेशामुळे सत्तेसाठी नव्हे तर विचारधारा जपणारा एक आश्वासक चेहरा काँग्रेसमध्ये दाखल होत आहे, याचा आनंद असल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांच्या होत्या. दादरच्या टिळक भवन येथे जगताप यांच्या पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या पक्षप्रवेशापूर्वी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळा सुरू होता; मात्र उपस्थितांची उत्सुकता मुख्यतः प्रशांत जगताप यांचीच होती. ‘जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यांच्या प्रवेशाचा महापालिका निवडणुकांमध्ये थेट फायदा झाला नाही, तरी पुणे शहरात बेदखल झालेल्या काँग्रेसला रस्त्यावर उतरून लढणारे आणि विचारधारेशी बांधिलकी असलेले नेतृत्व मिळाले आहे. भविष्यात पक्षउभारणीसाठी याचा फायदा होईल,’ असे मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
‘राज्यात सत्तेकडे जाण्याचा सार्वत्रिक कल दिसून येतो. विचारधारेला फारसे महत्त्व दिले जात नाही. विकासाच्या नावाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षाने चक्क शिवसेनेत प्रवेश केला, याकडे लक्ष वेधत अशा परिस्थितीत प्रशांत जगताप यांच्यासारखे वैचारिक बांधिलकी जपणारे काही नेते शिल्लक आहेत, हे निश्चितच वेगळे चित्र आहे, असे राजकीय विश्लेषक जयंत माईनकर यांनी सांगितले. ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबत बसणार नाही, हा त्याच्यामागचा विचार आहे.
कधी काळी केशवराव जेधे, काकासाहेब गाडगीळ हे पुण्यातील काँग्रेसचे मोठे नेतृत्व होते. त्यानंतर सुरेश कलमाडी यांनी पुण्यात काँग्रेसचा दबदबा कायम राखला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रशांत जगताप स्वाभाविकपणे शरद पवार यांच्यासोबत राहिले. या काळात सत्ताधारी भाजप तसेच अजित पवार यांच्या पक्षाविरोधात पुण्यात त्यांनी अनेक आंदोलने उभारली. यासाठी त्यांच्यावर १६ हून अधिक गुन्हे दाखल झाले. हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांचा केवळ ७,१२२ मतांनी पराभव झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अनेक नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे जगताप यांच्या येण्यामुळे काँग्रेसची बांधणी आता नीट होईल, असे सांगितले जाते.
माझी लढाई ही भाजप, संघ आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधातील आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचार पुढे नेण्यासाठी मी काँग्रेसमध्ये आलो, यापुढे राजकारण सोडीन; मात्र काँग्रेस कधी सोडणार नाही.
- प्रशांत जगताप, काँग्रेस नेते
...
शाहू, फुले, आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगताप यांना सर्व पक्षांकडून ऑफर असताना पुरोगामी विचार डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शुद्ध स्वरूपाच्या वैचारिक लढ्याला बळ मिळेल.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

