महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय,  बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय, बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Published on

महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय!
बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका ः एकनाथ शिंदे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ ः बाहेर कोण काय बोलते, युती होणार की नाही, या चर्चांकडे लक्ष देण्याची गरज नाही. महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुढाकार घेत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत नियमित बैठका सुरू आहेत. महायुतीमध्येच निवडणूक लढवून जिंकण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

डोंबिवलीत आयोजित ‘विजय निर्धार’ सभेत ते बोलत होते. या वेळी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, भाऊसाहेब चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मनसे नेते राजू पाटील यांनी महायुतीच्या चर्चांवर केलेल्या विधानावर उल्लेख करताना, त्यांचे नाव न घेता शिंदे यांनी बाहेर कोण काय बोलतेय, यावर लक्ष देऊ नका, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

अजेंडा विकासाचा
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, महायुतीच्या चर्चेत कोणाला काय कमी जास्त मिळाले, यापेक्षा आपला अजेंडा विकासाचा आहे. विकास आमचा विषय आहे. त्यामुळे महायुतीतच आपण लढणार, असे सांगत त्यांनी
आजच्या निर्धार मेळाव्यात विरोधकांना चारीमुंड्या चीत करून विकास करण्याचा निर्धार करा, असे आवाहन केले.

बँड वाजवायचा आहे
ब्रँड ब्रँड म्हणणाऱ्यांचा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत बँड वाजवायचा आहे, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयावरही टीका केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे एकत्र आले आहेत. मुंबईकडे ते ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ म्हणून पाहत आहेत. सत्तेसाठी, खुर्चीसाठी ते एकत्र आले; मात्र आमचा लढा मुंबईच्या आन- बान- शानसाठी आहे, असे ते म्हणाले.

लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकांत भगवा फडकला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकांतही महायुतीचाच भगवा फडकणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही बोलतो कमी आणि कामे जास्त करतो, ही बाळासाहेबांची शिकवण आम्ही अंगीकारली आहे, असे सांगत त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. डोंबिवलीकरांनी त्यांना निवडून देताना सिंहाचा वाटा उचलला असून त्यांनी मतदारसंघात विकासाचा रतीब घातल्याचेही शिंदे म्हणाले.

कार्यकर्ता म्हणूनच काम
मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झालो तरी आजही एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. तुम्हीही ‘एकनाथ शिंदे’ म्हणून काम करा, घराघरात शिवसेना पोहोचवा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखू लागले. त्यांच्यासाठी मोफत दवाखानाही सुरू केला, तरी ती दुखणी कमी होत नाहीत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना ‘जमालगोटा’ तुम्हालाच द्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com