शहरातील धुलीकण कमी करण्यासाठी उपाययोजना करा
शहरातील धूलिकण कमी करण्यासाठी कडक उपाययोजना
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वाढते वायू प्रदूषण आणि धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने व्यापक व कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांची विशेष बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून प्रभावी कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरू असून त्यातून होणारे वायू, ध्वनी प्रदूषण व धुळीचा प्रश्न गंभीर बनला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने बांधकाम साईटवरील प्रदूषण नियंत्रणासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर केली आहे. या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ७० हून अधिक विकसक व वास्तुविशारदांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत आयुक्तांनी शहराची हवा गुणवत्ता चांगली राखण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी जबाबदारीने उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश दिले. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या ८५ बांधकाम प्रकल्पांपैकी काही ठिकाणी पाहणी करून एसओपीची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस व तंत्रज्ञानाधारित पावले उचलण्यात येत आहेत.
हिवाळी हंगामात वाढणारी धूळ व धुरकटपणा लक्षात घेऊन महापालिकेने विशेष रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्रमुख महामार्गांवर नियमित धुलाई, कचरा जाळण्यावर बंदी, बेकायदा बांधकाम कचऱ्यावर कठोर कारवाई, तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे नवी मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
चौकट
उपाय :
- सर्व बांधकाम साईटवर सीसीटीव्ही व हवेची गुणवत्ता दर्शविणारे डिस्प्ले बसवणे
- वायू गुणवत्ता मोजमाप यंत्रणा केंद्रीकृत डॅशबोर्डशी जोडणे
- प्रत्येक दोन चौ.कि.मी. क्षेत्रासाठी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र उभारणे
- एसओपी उल्लंघन झाल्यास कामे थांबवणे व परवानगी रद्द करणे
- खोदकामासाठी कडक बॅरिकेड्स व दररोज मलबा हटवणे
- प्रमुख रस्त्यांवर दररोज दोन वेळा धुलाई
- कचरा जाळणे व बेकायदा कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

