चर्चेचे गुऱ्हाळ कायम!
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : महापालिका निवडणुकीसाठी मविआ आणि महायुती या दोन्ही राजकीय आघाडींचे जागावाटपावर एकमत होत नाही. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. शिवसेना आणि भाजपने एकमेकांना जागांचा प्रस्ताव दिला, तो स्थानिक स्तरावरील नेत्यांना मान्य नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून दिला आहे. त्यांच्याकडून निर्णय आल्यावर महायुतीचे चित्र स्पष्ट होणार आहे, तर महाविकास आघाडीने जागावाटपामध्ये आता मनसे हा नवा भिडू घेतला आहे. त्यांच्यामध्येही जागावाटपावर एकमत होत नसल्याने सर्वच राजकीय पक्ष ३० आणि ३१ डिसेंबर शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायला गर्दी करतील, असे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत आता दोन्ही आघाडींमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटासोबत चर्चा करण्यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यासुद्धा चर्चेत सहभागी झाल्या आहेत. शिंदे गटाकडे याआधीच्या ३८ आणि नव्याने पक्षप्रवेश करून आलेल्या माजी नगरसेवकांच्या शक्तीमुळे नगरसेवकांचे संख्याबळ तुलनेत वाढले आहे. त्यामुळे शिंदे गटाने भाजपसोबत झालेल्या बैठकीत ५७ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याउलट भाजपने शिंदे गटाला फक्त २० जागा देण्याचे आश्वासन दिले आहे आणि उर्वरित ९१ जागांवर स्वतः लढण्याची इच्छा भाजपने व्यक्त केली आहे. भाजपच्या या प्रस्तावाला शिंदे गटाने थेट विरोध केला आहे; पण भाजप त्यापेक्षा अधिक जागा देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
तत्पूर्वी नवी मुंबई स्तरावर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे अखेर हा प्रस्ताव दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे सोपवण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवर अद्याप निर्णय न झाल्याने दोन्ही पक्षांतील नगरसेवकपदाचे उमेदवार अर्ज तयार करण्याच्या मागे लागले आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये उमेदवार नसल्याने मारामार सुरू आहे.
काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात मनसेनेसुद्धा एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने ३० पेक्षा अधिक जागा लढविण्याचे तयारी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट हे दोघेसुद्धा ३० पेक्षा अधिक जागा लढवण्यास इच्छुक आहेत. यात मनसे हा नवा खेळाडू आल्यामुळे त्यांना जागा देण्यास कमी पडत आहेत. तसेच काही ठिकाणी मनसे, ठाकरे गट आणि काँग्रेसचे उमेदवार जागा मागत असल्याने मविआचाही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.
राष्ट्रवादीची चर्चा नाही
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये आतापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. या दोघांनी चर्चमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला घेतलेले नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत एकत्र जाण्याची तयारी अजित पवार गट करीत असल्याचे समजते.
मंदा म्हात्रे यांना हव्यात ५० जागा
आमदार मंदा म्हात्रे यांनी जागावाटपाच्या बैठकीनंतर बेलापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ५० जागांचा आग्रह पक्ष श्रेष्ठींकडे धरणार असल्याचे सांगितले. या कार्यकर्त्यांमुळे भाजपची आमदार निवडून आले आहेत. आता या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीनंतर जे पुन्हा भाजपमध्ये आले आहेत, त्या माजी नगरसेवकांचा नंतर विचार करावा, असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले.
भाजपच्या नवी मुंबईतील नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी आम्हाला फक्त २० जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तो आम्हाला बिलकुल मान्य नाही. आम्ही त्यांच्यासमोर शिवसेनेला ५७ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जागांवर एकमत न झाल्यामुळे आता दोन्ही पक्षांनी प्रस्ताव वरिष्ठांकडे दिले आहेत.
- द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, नवी मुंबई
कोणाला किती जागांची अपेक्षा?
शिवसेना शिंदे गट ५७
भाजप ९१
काँग्रेस ४०
राष्ट्रवादी शरद पवार गट ३५
शिवसेना ठाकरे गट ४०
मनसे ३५

