सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना नवी उर्जा मिळते

सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना नवी उर्जा मिळते

Published on

सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळते ः उपायुक्त सचिन सांगळे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : एरव्ही शाळेच्या गणवेशात असलेली मुले सांस्कृतिक महोत्सवानिमित्त विविध वेशभूषेमध्ये नटलेली पाहून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. वर्षभर अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाची आवश्यकता आहे. अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी होऊन त्यांना नवी ऊर्जा मिळते, नवे मार्ग सापडतात. त्याचबरोबर कलाही जोपासले जात असल्याचे मत शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांनी मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्‍घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
ठाणे महापालिका शिक्षण विभागामार्फत मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव व स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या महोत्सवाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. २३) पालिका शाळा क्रमांक २३, किसननगर येथे झाले. या वेळी उपायुक्त सचिन सांगळे, प्रभारी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गटाधिकारी संगीता बामणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी महोत्सवाच्या कार्याध्यक्ष सविता चौधरी आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या महोत्सवांमध्ये नृत्य आणि नाट्य विभाग अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. नृत्य विभागात पहिली ते पाचवीच्या एकूण ३०, सहावी ते आठवीच्या एकूण ४६ शाळांनी तर नाट्य विभागामध्ये २६ अशा एकूण १०२ शाळांमधील एकूण दोन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. महोत्सवामध्ये पहिली ते पाचवी पूर्व प्राथमिक आणि सहावी ते आठवी उच्च प्राथमिक अशा दोन विभागांमध्ये नृत्य स्पर्धा आणि पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा अनुक्रमे शाळा क्रमांक १३ - खोपट, शाळा क्रमांक २३ - किसननगर आणि शिक्षण विभाग कार्यालय तळमजला हॉल या ठिकाणी पार पडल्या.
याप्रसंगी शाळा क्रमांक १२०च्या विद्यार्थ्यांनी शिवशंभू गीत सादर केले. या स्पर्धेतील सर्व कार्यक्रमांचे विभागवार परीक्षण होऊन नृत्य, नाट्य विभागातून बक्षीसपात्र कार्यक्रम निवडण्यात आले असून, त्यांचे सादरीकरण मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सवात होणार आहे. या संपूर्ण महोत्सवाचे आयोजन आणि नियोजन सांस्कृतिक समितीने केले होते. त्यामुळे एकाच वेळेस तीन ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धा उत्तमरीत्या पार पडल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com