महायुतीत धुसफूस
महायुतीत धुसफूस
जागावाटपाच्या तिढ्यामुळे नाराज इच्छुकांची मविआकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम जसजसा जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील १५ ते २० नाराज इच्छुक उमेदवारांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेशी संपर्क वाढवल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत आहे. याच संधीचा फायदा घेत महाविकास आघाडी आणि मनसेने जाळे फेकले आहेत.
भाजप आणि शिंदे गटात प्रभागनिहाय रस्सीखेच सुरू आहे. कोणता प्रभाग कोणाकडे जाणार आणि कोणाचे तिकीट कापले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जर युती झाली, तर दोन्ही पक्षांतील अनेक प्रस्थापित नगरसेवकांना घरी बसावे लागण्याची भीती आहे. हीच भीती आता बंडखोरीचे मुख्य कारण ठरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणमधील ७ ते ८ आणि डोंबिवलीतील १० ते १२ दिग्गज इच्छुक सध्या पर्यायी राजकीय वाटा शोधत आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक एकत्र लढवण्याचे संकेत दिल्याने चित्र पालटले आहे. या नव्या समीकरणामुळे महायुतीतील नाराज घटकांना एक प्रबळ पर्याय मिळाला आहे. महायुतीने १२२ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली असली, तरी अंतिम क्षणी होणारी युती अनेकांसाठी राजकीय अडथळा ठरणार आहे.
रवींद्र चव्हाणांची रणनीती
कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असला, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपची ताकद या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील विजयाने भाजपचा आत्मविश्वास उंचावला असून, केडीएमसीवर स्वबळावर भाजपचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. मात्र, भाजपचा हा वाढता प्रभाव शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरत असून, त्यातूनच समन्वय बिघडल्याचे दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

