काळू, शाई नदीवरील मोठ्या धरणांना विरोध

काळू, शाई नदीवरील मोठ्या धरणांना विरोध

Published on

मुरबाड, ता. २७ (बातमीदार) : ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मुरबाड तालुक्यातील शाई व काळू नदीवर मोठी धरणे बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, या धरणांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी विस्थापित होणार असल्याने ही दोन्ही धरणे रद्द करून त्याऐवजी शाई व काळू नदीवर १३ लघु पाटबंधारे उभारण्यात यावेत, अशी ठाम मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
शाई व काळू नदीवर प्रस्तावित धरणांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची सभा २५ डिसेंबरला मुरबाड तालुक्यातील शिरोशी येथे पार पडली. या सभेत मोठ्या धरणांना विरोध करण्याचा; तसेच पर्यायी उपाय म्हणून लघु बंधाऱ्यांचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव देशमुख होते. या वेळी मुंबई महानगर परिसरातील विविध प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची एकजूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मते, मोठी धरणे उभारल्यास अनेक गावे विस्थापित होतील; मात्र छोट्या-छोट्या बंधाऱ्यांमुळे एकही गाव विस्थापित न होता शहराची पाण्याची गरजही पूर्ण होऊ शकते. बैठकीत धना दांडगे यांनी खरेदी करून पडिक ठेवलेल्या जमिनीवर कब्जा करून तेथे शेती लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत सर खोत, उमेश वारघडे, हिरामण भोईर, पंढरीनाथ दळवी, शरद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

गावांचा दौरा
जनजागृतीसाठी १० व ११ जानेवारीला धरणविरोधी शेतकरी संयुक्तपणे धरण परिसरातील गावांचा दौरा करणार आहेत. नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप स्थापन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

यापूर्वीही मागणी
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोटीराम पवार, सामाजिक कार्यकर्त्या इंदु हिंदवी तुळपुळे यांनीही यापूर्वी सरकारकडे मोठी धरणे उभारण्याऐवजी या नद्यांवर लघु धरणे व बंधारे बांधण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com