वसईत महाविकास आघाडीत बिघाडी!
वसईत महाविकास आघाडीत बिघाडी!
ठाकरे गटाचा ‘एकला चलो रे’चा नारा; ११५ जागांवर लढणार
वसई, ता. २७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीला मोठा तडा गेला आहे. बहुजन विकास आघाडीसोबत (बविआ) जागावाटप आणि चिन्हावरून सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने अखेर शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत शिवसेना नेते विलास पोतनीस यांनी उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केल्याची माहिती दिली.
वसईतील शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर विलास पोतनीस यांनी परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, की आम्ही महायुतीचा उन्माद रोखण्यासाठी बविआसोबत युती करण्यास सकारात्मक होतो. मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेटही घेतली होती. २९ प्रभागांत प्रत्येकी एक जागा महाविकास आघाडीला सोडावी, असा आमचा प्रस्ताव होता; मात्र बविआने केवळ ११ जागा (आठ ठाकरे गट आणि तीन मनसे) सोडण्याची तयारी दर्शवली, जी आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही आता ११५ जागांवर स्वबळावर लढणार आहोत.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या हाती ‘शिवबंधन’
एकीकडे युती तुटत असतानाच दुसरीकडे भाजप नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा उपाध्यक्ष सचिन राऊत आणि विश्वकर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शनिवारी पंचवटी येथील शहर शाखेत ‘शिवबंधन’ बांधले. या प्रवेशामुळे संघटनेला मोठी ताकद मिळाल्याची प्रतिक्रिया विलास पोतनीस यांनी दिली.
मनसेची भूमिका गुलदस्त्यात
स्थानिक पातळीवर मनसे कार्यकर्ते बविआसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना पोतनीस म्हणाले, की ठाकरे गटाने सध्या फारकत घेतली असली तरी आम्ही राज ठाकरे यांच्याशी चर्चा करीत आहोत. मनसेला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.
अद्याप आशेचा किरण?
एकीकडे स्वबळाची घोषणा केली असली तरी विलास पोतनीस यांनी पूर्णपणे दरवाजे बंद केलेले नाहीत. २९ जागांचा आमचा हट्ट नाही, पण सन्मानजनक तोडगा निघाला तर आम्ही अजूनही एकत्र लढण्यास तयार आहोत. हितेंद्र ठाकूर यांची भूमिका यामध्ये निर्णायक ठरेल, असे सांगून त्यांनी तडजोडीची शक्यता कायम ठेवली आहे.

