अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षसह दहा जणावर गुन्हा दाखल
काळोखे हत्येप्रकरणी दहा जणांवर गुन्हा
खोपोलीत तणावपूर्ण शांतता; पाच अटकेत
खालापूर, ता. २७ (बातमीदार) ः खोपोलीत शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता, नगरसेविकेचा पती मंगेश सदाशिव काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण (साईबाबानगर खोपोली), अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे (कर्जत), भरत भगत (अवसरे कर्जत), रवींद्र देवकर यांचा बाऊंसर आणि तीन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. तर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी रात्री उशिरा रवींद्र आणि दर्शन देवकर या वडील- मुलाला अटक केली आहे. अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे. खोपोली नगर परिषद निवडणुकीत मंगेश यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी ऊर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. ऊर्मिला देवकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या. पराभवाच्या रागातून देवकर कुटुंबाने मंगेश यांचा शुक्रवारी खून केल्याचा आरोप करीत त्यांचे समर्थक आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी खोपोली पोलिस ठाण्यावर ठिय्या देत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग अडवला होता. जोपर्यंत सर्व आरोपी पकडले जात नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने खोपोलीत तणावाचे वातावरण होते.
पोलिसांचे आश्वासन
कामानिमित्त परदेशात असलेल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी रात्री उशिरा खोपोली पोलिस ठाण्यात भेट देत सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन पोलिसांकडून घेतल्यानंतर मंगेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी नाकाबंदीत शुक्रवारी रात्री रवींद्र आणि दर्शन देवकर यांना नागोठणेतून अटक केली. तसेच आणखी तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
-----
आंदोलनाचा इशारा
शनिवारी आमदार महेंद्र थोरवे यांनी काळोखे कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक न झाल्यास खोपोली पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन करू, असा इशारा दिला. आमदार थोरवे यांनी काळोखे यांच्या खुनाच्या कटात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा सहभाग असल्याचा आरोप करीत आरोपी देवकर कुटुंबाने आठवड्यापूर्वी सरकारी वकील यांच्याशी चर्चा करत थेट सुतारवाडी गाठली असल्याचा गंभीर आरोपदेखील केला. सुनील तटकरे रायगड जिल्ह्यातील आका असून तेच सर्व घडवत आहेत, असा आरोप थोरवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
------
फोटो -
आमदार महेंद्र थोरवे यांनी नगरसेविका मानसी काळोखे यांची सांत्वनपर भेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

