लंपट सासऱ्याची छुप्या कॅमेऱ्याने सुनेने केली पोलखोल

लंपट सासऱ्याची छुप्या कॅमेऱ्याने सुनेने केली पोलखोल

Published on

सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : घरातील नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लंपट सासऱ्याच्या विकृत कृत्यांचा छुप्या कॅमेऱ्याने पुरावा गोळा करत सुनेनेच त्याची पोलखोल केली आहे. सातत्याने लैंगिक छळ सहन करावा लागल्यानंतर अखेर पीडित सुनेने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई सुरू केली आहे.
यातील विवाहितेचा वर्षभरापूर्वी कल्याण येथील तरुणासोबत विवाह झाला होता. पीडिता कल्याण येथे सासू-सासरे व दीर यांच्यासह राहत होती. या पीडितेचा सासरा (वय ५५) काही दिवसांपासून तिचा लैंगिक छळ करीत होता. घरात कोणी नसताना सासरा सुनेशी अश्लील वर्तन करीत होता. अखेर पीडितेने छुप्या कॅमेऱ्याने सासऱ्याचे अश्लील वर्तन कैद केले. पीडितेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्याने वडिलांना मारहाण केली. अखेर पीडितेने माहेरी आश्रय घेतला. त्यानंतर तिने उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळ कल्याण येथे असल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी कोळसेवाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com