जागावाटपात भाजपात अस्वस्थतता
जागावाटपात भाजपमध्ये अस्वस्थता
कल्याण पूर्वेत कार्यकर्त्यांचा स्वबळाचा सूर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत असताना भाजपमध्येच नाराजीचे वादळ उठले आहे. विशेषतः कल्याण पूर्वेत भाजपला अवघ्या सात जागा देण्यात येत असल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार प्रचंड अस्वस्थ झाले असून, याच नाराजीचा उद्रेक शुक्रवारी (ता. २६) रात्री भाजपच्या कल्याण पूर्वेतील आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात पाहायला मिळाला.
सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे कार्यकर्ते जमले होते. युती झाली असली तरी हा अन्यायकारक वाटपाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. भाजपची ताकद असतानाही कमी जागा देऊन पक्षाची कोंडी करण्यात आली आहे, अशी तीव्र भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. काही कार्यकर्त्यांनी तर थेट आम्हाला युती नको, भाजपने स्वबळावरच निवडणूक लढवावी, अशी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी यापूर्वी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची मागणी अधिक आक्रमक झाली आहे. जर ते स्वबळाची भाषा करत असतील, तर भाजपनेही आत्मविश्वास दाखवावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. कल्याण पूर्व हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथे स्वबळावर निवडणूक लढवली तर अधिक जागा जिंकता येऊ शकतात, असा ठाम दावा अनेक कार्यकर्त्यांनी केला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली असताना, महायुतीतील हा अंतर्गत गोंधळ भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. एकीकडे युती टिकवण्याचा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न, तर दुसरीकडे तळागाळातील कार्यकर्त्यांचा वाढता असंतोष या दोन टोकांमध्ये भाजप अडकलेला दिसतो. पुढील काही दिवसांत पक्षनेतृत्व काय निर्णय घेते, यावर राजकारणाची दिशा ठरणार आहे.
वरिष्ठ नेत्यांची मनधरणी अपयशी
या गोंधळाची माहिती मिळताच भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि निवडणूक प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी तातडीने आमदार कार्यालयात धाव घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्ते कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे चित्र होते. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेत आहोत. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असला तरी स्थानिक प्रश्नांवर चर्चा सुरू आहे. सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल, असे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

