

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ : महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरले नाही. अशावेळी बंडखोरी होऊ नये, म्हणून कोणत्याच पक्षाने त्यांच्या उमेदवारांना एबी अर्जाचे वाटप केले नाही. परिणामी, निवडणूक विभागाकडे राजकीय पक्षाच्या एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही.
१५ जानेवारीला नवी मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. त्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ डिसेंबरपासून मुदत देण्यात आली आहे. मंगळवार (ता. ३०)पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत; मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मित्र पक्षांचे जागावाटपाचे समीकरण ठरत नसल्याने इच्छुक उमेदवारांचे एबी अर्ज सर्वच पक्षांनी अडवून धरले आहेत. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचे जागावाटपाच्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत.
भाजपने शिंदे गटाला फक्त २० जागा देऊ केल्या आहेत. या उलट शिंदे गटाकडून ५७ जागा भाजपकडे मागितल्या आहेत. तसेच महापौर आणि स्थायी समिती या महत्त्वाच्या पदांवर चर्चा झालेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून मतभेद असल्याने महायुतीचा निर्णय गुलदस्त्यात राहिला आहे. यादरम्यान ज्या जागा निश्चित झाल्या नाहीत, त्याठिकाणी एबी अर्ज दिल्यास बंडखोरी होण्याची भीती पक्षातील वरिष्ठांना आहे.
भाजप आणि शिंदे गटात अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक आहे. अनेक नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीत या उलट परिस्थिती असली तरी काही निवडक जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे उमेदवार ठरत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी इच्छुक उमेदवारांचे एबी अर्ज अडवून धरले आहेत. या सगळ्या नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन एबी अर्ज पदरात पडून घेण्यासाठी उमेदवार गर्दी करीत आहेत; परंतु अर्ज भरण्यासाठी एबी अर्ज मिळत नसल्याने अनेक उमेदवारांची घालमेल सुरू आहे.
नेरूळच्या जागेवरून वाद
महाविकास आघाडीत नेरूळ आणि जुईनगर येथील जागेवरून वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल ससाणे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर याच जागेवर काँग्रेसचे प्रवक्ते आणि इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनीही तयारी केली आहे. ही एक जागा अनुसूचित जागा म्हणून आरक्षित असून ठाकरे गट ही जागा काँग्रेसला सोडण्यास तयार नाही. या एका जागेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे घोडे अडले आहे. नेरूळच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्यासाठी प्रदेश समितीवरील नेते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करीत असल्याची माहिती निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी दिली.
महायुतीला बंडखोरीची भीती
शिवसेना शिंदे गट आणि भाजप या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत युती करण्याचे आदेश नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांना दिले आहेत; मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी युती करण्यास इच्छुक नाहीत. युती झाल्यास दोन्ही पक्षांत बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.