नाणे येथील डोंगराला वणवा
नाणे येथील डोंगराला भीषण वणवा
वनसंपदेचे नुकसान; वन्यजीवांचा अधिवास धोक्यात
मनोर, ता. २८ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील हमरापूर-सांगे रस्त्यावरील नाणे गावाच्या हद्दीतील डोंगराला लागलेल्या भीषण वणव्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वनसंपदा खाक झाली आहे. या आगीत दुर्मिळ औषधी वनस्पती, गवत आणि झुडपे नष्ट झाल्याने जैवविविधतेला मोठा फटका बसला असून, वन विभागाच्या ढिसाळ नियोजनावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दुपारच्या सुमारास डोंगरावरून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली; मात्र बराच वेळ उलटूनही एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले; मात्र पुरेशी साधनसामग्री उपलब्ध नसल्याने आग नियंत्रणात आणण्यात त्यांची मोठी ओढाताण झाली.
पालघर जिल्ह्यात साधारणतः मार्च महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढते; मात्र यंदा डिसेंबरमध्येच वणवे लागण्यास सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे वणवे मानवनिर्मित असल्याचा दाट संशय असून, डोंगरावरील वन्यप्राण्यांच्या जीविताला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
कारवाईची मागणी
मानवनिर्मित वणवे रोखण्यासाठी जंगलात ‘फायर लाइन’ तयार करणे, गस्त पथके नेमणे यांसारख्या उपाययोजना करण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. नाणे येथील या घटनेची सखोल चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनरक्षक आणि वनपालांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

