...अखेर रीलस्ट्रारला माफी मागावी लागली
उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : समाज माध्यमाच्या बेफिकीर वापरातून धार्मिक भावना दुखावण्याचा गंभीर प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीस आला आहे. समाज माध्यमांवर अवघ्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या एका रीलमुळे ख्रिश्चन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीकडून सार्वजनिक माफी मागवून घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर अपलोड करण्यात आलेली एक रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या रीलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाशी संबंधित धार्मिक गीताचा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापर करण्यात आला होता. ही रील समाजात पोहोचताच ख्रिश्चन समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. धार्मिक भावनांचा अवमान करणाऱ्या या प्रकाराचा कडाडून निषेध नोंदवण्यात आला. यानंतर काही नागरिकांनी उल्हासनगर येथील पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यालयात जाऊन याबाबत निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी ख्रिश्चन एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष जितू राठोड; तसेच ख्रिश्चन समाजाच्या प्रतिनिधींनी केली. भविष्यात अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्यांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधितावर कारवाई केली.
पोलिसांनी त्याच्याकडून व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागवून घेतली आहे. या माफीच्या व्हिडिओमध्ये त्याने हे कृत्य चुकून झाल्याची कबुली देत, ख्रिश्चन समाजाची जाहीर माफी मागितली आहे. पोलिसांकडून समाज माध्यमांवरील अशा संवेदनशील विषयांबाबत नागरिकांनी जबाबदारीने वागावे, धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

