पनवेलच्या वडाळे तलावावर परदेशी जलपर्णीचा विळखा
पनवेलच्या वडाळे तलावावर परदेशी जलपर्णीचा विळखा
साल्विनिया मोलेस्टामुळे जैवविविधतेला धोका; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
खारघर, ता. ३० (बातमीदार) : पनवेल शहरातील ऐतिहासिक वडाळे तलाव सध्या ‘साल्विनिया मोलेस्टा’ या धोकादायक परदेशी जलपर्णीच्या प्रचंड वाढीमुळे गंभीर संकटात सापडला आहे. या जलपर्णीने तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापल्याने तलावातील नैसर्गिक जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला असून, जलचर सजीव, पक्षी व स्थानिक वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खारघर वेटलँड्स अँड हिल्सच्या पदाधिकारी ज्योती नाडकर्णी आणि सिटिझन युनिटी फोरमच्या सचिव रंजना साडोळीकर यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वडाळे तलाव हा ऐतिहासिक पेशवेकालीन आहे. एकेकाळी हा तलाव स्थलांतरित पक्षी, मासे तसेच विविध स्थानिक जलचर वनस्पतींसाठी महत्त्वाचे नैसर्गिक आश्रयस्थान होता. मात्र गेल्या काही दिवसांत साल्विनिया मोलेस्टा या परदेशी जलपर्णीने झपाट्याने वाढ घेत तलावाचा मोठा भाग व्यापला आहे. ही जलपर्णी अतिशय वेगाने वाढत असल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नाही आणि त्यामुळे मासे व इतर जलचर सजीवांचे जीवन धोक्यात येते. परिणामी संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून ‘सायरटोबॅगस साल्व्हिनिया’ नावाच्या विशिष्ट कीटकाचा वापर प्रभावी ठरू शकतो, अशी माहिती पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. हा कीटक केवळ साल्विनिया मोलेस्टा या वनस्पतीवरच उपजीविका करतो आणि इतर कोणत्याही सजीवाला हानी पोहोचवत नाही. त्यामुळे पर्यावरणस्नेही व शाश्वत उपाय म्हणून या कीटकाचा वापर करून जलपर्णीच्या वाढीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत नाडकर्णी व साडोळीकर यांनी आयुक्तांकडे मांडले.
...............
दरम्यान, पनवेल परिसरातील तलाव, नाले, पाणथळ जागा आणि इतर जलस्रोतांमध्ये वाढणाऱ्या अशा आक्रमक वनस्पतींची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे, अशीही मागणी करण्यात आली. यावर आयुक्त मंगेश चितळे यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेच्या पर्यावरण विभागाशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

