दहशत माजविण्याचा डाव उधळून लावला

दहशत माजविण्याचा डाव उधळून लावला

Published on

उल्हासनगर, ता. ३१ (बातमीदार) : ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये आणि पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याने गुन्हेगारीविरोधात आक्रमक कारवाई सुरू ठेवली आहे. अवघ्या १५ दिवसांत दोन सराईत गुन्हेगारांना एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध केल्यानंतर, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई करून पोलिसांनी संभाव्य दहशतीचा डाव उधळून लावला आहे.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील शिपाई सानप व मंगेश वीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पॅनल क्रमांक १८ मधील सुभाष टेकडी परिसरात, सर्टिफाय स्कूलच्या मैदानात एक संशयित व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन बसलेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती अतिशय गंभीर असल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी पथकासह संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवली. तेथे सोनू प्रकाश ठाकूर (वय २१) हा संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याला पळून जाण्याची संधी न देता सायंकाळी ताब्यात घेऊन दोन पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. यादरम्यान त्याच्या कमरेच्या मागे लोखंडी, देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. सोनू हा शहाड फाटक परिसरात राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. तो कोणत्या उद्देशाने पिस्तूल बाळगून परिसरात आला होता, याबाबत कसून चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. निवडणुकीच्या संवेदनशील काळात झालेल्या या कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून विठ्ठलवाडी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com