गवळीदेव पर्यटनस्थळाच्या विकासकामांना गती
गवळीदेव पर्यटनस्थळाच्या विकासकामांना गती
सुमारे चार कोटींचा कायापालट; पर्यटकांना मिळणार सोयीसुविधा
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबईकरांचे प्रमुख नैसर्गिक आकर्षण असलेले गवळीदेव पर्यटनस्थळ अखेर नूतन वर्षात नव्या आणि सुसज्ज रूपात पर्यटकांच्या सेवेत येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पर्यटनस्थळाच्या विकासकामांना आता गती मिळाली असून नवी मुंबई महापालिकेकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी खर्च करून गवळीदेव पर्यटनस्थळाचा सर्वांगीण कायापालट करण्यात येत आहे.
गवळीदेव धबधबा आणि त्यालगतचा निसर्गरम्य परिसर हा नवी मुंबईकरांसह मुंबई-ठाण्यातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे; मात्र दीर्घकाळ विकास रखडल्याने तसेच आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. या पार्श्वभूमीवर ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक तसेच माजी खासदार राजन विचारे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करून या पर्यटनस्थळाच्या विकासाची मागणी लावून धरली होती. अखेर वनविभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिकेमार्फत या परिसराच्या विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. या विकास प्रकल्पासाठी एकूण खर्चापैकी सुमारे एक कोटी ५० लाख रुपये शासनाकडून, तर उर्वरित निधी नवी मुंबई महापालिकेमार्फत खर्च करण्यात येणार आहे. यापूर्वी पालिकेने गवळीदेव परिसरात भव्य प्रवेशद्वार व दीपस्तंभ उभारण्यासाठी सुमारे ४२ लाख रुपये खर्च केले होते. आता दुसऱ्या टप्प्यात पर्यटकांसाठी विविध अत्यावश्यक आणि आकर्षक सुविधा उभारण्यात येत आहेत.
..............
नूतन वर्षात पर्यटनांचा आनंद
विकासकामाअंतर्गत स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, डोंगरकड्यांवर संरक्षण कठडे, डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी आकर्षक पायऱ्या, विहिरी व तलावांची स्वच्छता, पर्यटन विश्रांतीकक्ष, पर्यटकांसाठी बसण्याची सोय, पक्षी व प्राण्यांची माहिती देणारे फलक, पथदिवे, कचराकुंड्या तसेच नियमित देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अभियंता विभागाने दिली. सध्या ही कामे प्रगतिपथावर असून येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत बहुतांश कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. गवळीदेव पर्यटनस्थळ पूर्णत्वास गेल्यानंतर नूतन वर्षात आणि विशेषतः यंदाच्या पावसाळ्यात नवी मुंबईकरांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधांसह निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

