ठाणे परिवहन बसच्या महिला वाहक राईट टू पी पासून वंचित
ठाणे परिवहन बसच्या महिला वाहक ‘राईट टू पी’पासून वंचित
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) ः ठाणे महानगरपालिकेकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सामान्य महिलांसाठी पुरेसे शौचालय बांधण्यात आले नसतानाच महापालिकेच्या परिवहन विभागात काम करणाऱ्या महिला वाहकांना देखील या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. महिला वाहकांसाठी बसच्या अंतिम स्थानकांवर शौचालयांची पुरेशी व्यवस्था नसल्याने आरोग्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सर्वच नागरिकांना शौचालयाच्या सुविधांची उपलब्धता करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी या सुविधांची आवश्यकता असते. केंद्राच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देखील या सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे, परंतु ठाणे पालिकेकडून मात्र या सुविधा उपलब्ध करून देण्यात हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. बाजाराच्या ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी या सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी नजर टाकल्यास येथे या प्रकारच्या सुविधा नसल्यात जमा आहेत. त्यामुळे सामान्य महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर बाब समोर आलेली असतानाच ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून देखील त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांकरिता अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करून देण्यात तोकडा ठरला आहे. नियमानुसार परिवहन विभागाच्या बसवर चालक, वाहकाचे काम करणाऱ्या महिलांसाठी बसच्या अंतिम स्थानकावर स्वच्छ शौचालयाची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. परंतु, परिवहन विभागाकडून या सुविधा देण्यात आल्या नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शेवटच्या बस स्थानकात महिला विश्रांती घेत असूनही त्यांच्याकरता या सुविधा उपलब्ध नसल्याने शौचास जाण्यासाठी अथवा मासिक पाळी आल्यावर या महिला कर्मचाऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण होताना दिसते.
राईट टू पी चळवळ :
काही वर्षांपूर्वी महिलांनी महिलांच्या सुविधांसाठी राईट टू पी चळवळ सुरू केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक संस्थानिकांसोबत पाठपुरावा केला जात आहे. परंतु, संबंधित यंत्रणांकडून या बाबीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चळवळ चालवणाऱ्या महिलांचे म्हणणे आहेत.
महिला विशेष बस प्रवास बंद :
ठाणे महानगरपालिकेने महिलांसाठी राज्यातील पहिली विशेष बस सेवा सुरू केली. याकरिता परिवहनने फक्त महिलांकरिता विशेष बस देखील खरेदी करून रस्त्यावर उतराविला होत्या, मात्र ही सेवा देखील काही महिन्यातच बंद करण्यात आली.
परिवहन सेवेत ५०० हून अधिक महिला
ठाण्यातील आनंद नगर, वागळे, कोपरी लोकमान्यनगर आदी आगारात ५०० हून अधिक महिला वाहक दोन पाळीमध्ये काम करतात. तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयसवाल यांनी शौचालयांना एक रुपयात २० लिटर पाणी मिळण्याचे स्मार्ट वॉटर योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार काही ठिकाणी ही योजना कार्यान्वयित करण्यात आली होती. कापुरबावडी, मानपाडा, वाघबील आदी ठिकाणी सुरू केलेली ही योजना बंद झाली आहे.
शौचालयांसाठी पैसे
शहरातील सुलभ शौचालयांमध्ये लघुसंखेसाठी मोफत सुविधेची योजना असतानाही ठेकेदाराकडून या सेवेसाठी महिलांकडून पैसे घेतले जातात. ठाणे रेल्वे स्थानक ठाणे एसटी आगार आणि इतर ठिकाणी महिलांना मोफत सेवा देण्याऐवजी त्यांच्याकडून शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार दिसून येत आहेत.
या गंभीर मुद्द्याबाबत परिवहन मंत्र्यांसह आणि महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थापनाकडे लेखी निवेदन दिले आहे. त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
- प्रेमा ठाकूर, माँ फाउंडेशन, संचालिका, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

