राजकीय नाट्याचा एक्सप्रेस प्रवास
भाजप–राष्ट्रवादी–शिवसेना: ७२ तासांत बदलले तीन पक्ष
उल्हासनगरमध्ये राजकिय नेत्यांचा वेगवान ‘यू-टर्न’
राजकीय नाट्यामुळे मतदार राजाही संभ्रमात
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : आगामी निवडणूकांचा विचार करता सध्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उल्हासनगरमध्येही त्याची प्रचिती येत असून येथील राजकीय समिकरणही दिवसागणिक बदलत आहे. येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका निवडणुकीतील राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या संपूर्ण पॅनेलने ऐनवेळी अर्ज मागे घेत, शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उल्हासनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय घडामोडीही घडत आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधील एका प्रकाराने पक्षनिष्ठा, तत्त्व आणि विचारधारा यापेक्षा संधी महत्त्वाची ठरते का, असा थेट सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. या प्रभागात निलेश बोबडे, रवी वसिटा, सुरज कारकर आणि एक महिला उमेदवार हे सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते होते. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या चारही उमेदवारांनी अचानक आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले व थेट शिवसेने (शिंदे गट)ला पाठिंबा जाहीर केला. परिणामी, प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे संपूर्ण पॅनलच निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. आपल्या या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना निलेश बोबडे यांनी सांगितले की, “सुरुवातीला आम्ही ज्या पक्षात (भाजप) होतो, त्यांनी आमच्यावर अन्याय केला. आम्ही अनेक वर्षे मेहनत घेतली, मात्र तिकीट देताना बाहेरून आलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच आम्ही बंडखोरी केली.” तर अर्ज मागे घेण्याबाबत सुरज कारकर म्हणाले की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून अर्ज भरला होता, पण अर्ज मागे घेतल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला खेद आहे. तसेच शिवसेनेचा आणि आमचा दृष्टीकोन एकच असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, या पॅनलमधील काही उमेदवारांनी अवघ्या दोन दिवसांत भाजप - राष्ट्रवादी अजित पवार गट- शिवसेना शिंदे गट असा राजकीय प्रवास केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या घटनेमुळे निवडणुकीतील पक्षनिष्ठा, विचारसरणी आणि राजकीय नैतिकता या संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याच्या भावणा स्थानिक मतदारांनी व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

