कर्जतेमध्ये ६२ वनराई बंधाऱ्यांची उभारणी
कर्जतमध्ये ६२ वनराई बंधाऱ्यांची उभारणी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून जलसंधारण
कर्जत, ता. ७ (बातमीदार) : रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत नाले, ओढे व लहान नद्यांमध्ये पाणी अडवण्यासाठी एकाच दिवशी तब्बल ६२ वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. बुधवारी (ता. ७) हा उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडला.
या अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील जंगल भाग व दुर्गम परिसरात असलेल्या नाले व ओढ्यांवर वनराई बंधारे उभारून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. ग्रुप ग्रामपंचायत माणगाव (वरेडी)अंतर्गत बेकरे ठाकूरवाडी येथे हा उपक्रम यशस्वी झाला. या वेळी ग्रामपंचायत अधिकारी शरदचंद्र पवार, ग्रामपंचायत कर्मचारी भरत मुकणे, पंचायत विस्तार अधिकारी भालेराव, कृषी अधिकारी चव्हाण, ग्रामस्थ गणेश पारधी, जैतू पारधी, महिला बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका तसेच सीआरपी ताई यांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले. बेकरे, नेरळ, मोहाचीवाडी, पिंपळोली, बांगरवाडी आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेण्यात आला. या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यानंतर वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याचा फायदा शेती, पिण्याचे पाणी तसेच जंगलातील वन्य प्राण्यांना होणार असून, तालुक्यातील जलसंधारणासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व दीर्घकालीन परिणाम देणारा ठरणार आहे.
...............
अतिदुर्गम भागात भेटी
कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी या मोहिमेत स्वतः पुढाकार घेत विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत श्रमदानात सहभाग नोंदवला. माथेरानच्या डोंगरकुशीत वसलेल्या बेकरे ठाकूरवाडी या अतिदुर्गम आदिवासी वाडीमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात आला. या भागात पक्क्या रस्त्याची सुविधा नसतानाही अधिकारी व कर्मचारी कच्च्या रस्त्याने जंगलात पोहोचले. वन्य प्राणी तसेच स्थानिक ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने येथे वनराई बंधारे उभारण्यात आले.
...............................
प्रतिक्रिया
रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर एकाच दिवशी ६२ वनराई बंधारे बांधण्यात आले. जलसंधारणासाठी हा उपक्रम भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल.
- सुशांत पाटील, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

