बदलापूर एमआयडीसी हादरली; रात्रभर स्फोटांची मालिका,
बदलापूरमधील आगीवर पहाटे नियंत्रण
वीसहून अधिक स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला
बदलापूर, ता. ८ (बातमीदार) ः शहराच्या पूर्वेतील शिरगाव जलशुद्धीकरण केंद्रासमोर असलेल्या एमआयडीसी परिसरात पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीला बुधवारी (ता. ७) भीषण आग लागली. कंपनीतील केमिकल रिऍक्टरमध्ये स्फोट होऊन आगीने रौद्र रूप धारण केले. तब्बल वीसहून अधिक स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या आगीवर पहाटे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बदलापूर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच अंबरनाथ व उल्हासनगर येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर वांगड व अंबरनाथचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पहाटे चारच्या दरम्यान आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या आगीत पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनी जळली. तर शेजारील तिचीच दुसरी शाखा, तसेच नोव्हा ओलिओ आणि ईस्टर या दोन कंपन्यांनाही आगीची झळ पोहोचली. बदलापूर, अंबरनाथ, अंबरनाथ एमआयडीसी व उल्हासनगर या चारही परिक्षेत्रांतील अग्निशमन दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र केमिकलने भरलेल्या ड्रमचे स्फोट झाल्याने आगीचे स्वरूप अधिक गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे शिरगाव, मानकिवली, आपटेवाडी, कात्रप व गावदेवी परिसरात केमिकलयुक्त धुराचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. मागील काही वर्षांपासून या परिसरातील कंपन्यांमध्ये अशा घटना घडत आहेत. वेळोवेळी नोटिसा देऊनही कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी बेजबाबदार कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

