पुढील २० वर्षे करवाढ नाही
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : नवी मुंबईच्या विकासाचे पुढील ३० वर्षांचे व्हिजन तयार केल्याचे सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोशीर धरण उभारून शहराच्या पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा केली. मागील २५ वर्षे मालमत्ता कर व पाणीपट्टी वाढवली नाही. पुढील २० वर्षेही करवाढ न करता शहराचा वेगवान विकास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळे नवी मुंबई राज्यात विकासात आघाडीवर असल्याचे सांगून गणेश नाईक यांच्या नेतृत्वात शहराने नवे मानदंड प्रस्थापित केल्याचे नमूद केले.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा गुरुवारी (ता. ८) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. माजी खासदार तथा निवडणूक प्रमुख डॉ. संजीव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात १०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि ५०० खाटांचे नवीन रुग्णालय, महापालिकेची सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन थिएटर्स उभारणे यांसारख्या महत्त्वाकांक्षी आरोग्यविषयक घोषणा करण्यात आल्या. त्याचप्रमाणे पीजी ते केजी मोफत शिक्षण, इंग्लिश व सीबीएसई माध्यमांच्या अतिरिक्त शाळा तसेच ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना पूर्ण करमाफी व ५०१ ते ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ६० टक्के करसवलत जाहीर करण्यात आली आहे.
बिल्डरविरहित झोपडपट्टी पुनर्विकास जमिनीच्या मालकी हक्कासह सिडको सोसायट्यांतील गरजेपोटी बांधकामे नियमित करणे, घणसोली-ऐरोली पामबीच मार्ग, तुर्भे-खारघर रस्ता प्रकल्प, कोपरखैरणे-विक्रोळी उड्डाणपूल, मल्टिलेव्हल पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. तसेच महिलांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी विशेष उपक्रम, बचत गटांच्या उत्पादनांसाठी मोक्याच्या जागा, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास सुविधा कायम ठेवणे आणि विरंगुळा केंद्रांची संख्या वाढविणे यांचा समावेश आहे.
जनरेशन नेक्स्टसाठी नवे धोरण
एआय को-वर्किंग स्पेस, कंटेंट क्रिएटिव्ह स्टुडिओ, स्टार्टअफ्सना प्रोत्साहन, ई-सायकल, ई-स्कूटर आणि फीडर बस सेवा, डिजिटल पार्किंग बुकिंग, स्ट्रेस रिलीफ सेंटर्स, आधुनिक शिशुगृह अशा भविष्योन्मुख संकल्पनांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व तलाव सुरक्षित करणे, झीरो डस्ट पॉलिसी, सोलर ऊर्जा प्रकल्प, हवा गुणवत्ता सुधारणा, कूल रुफ पॉलिसी, फूड ट्रक व फेरीवाला धोरण, खेळाची मैदाने व आधुनिक होर्डिंग पॉलिसी यांद्वारे सुनियोजित व पर्यावरणपूरक नवी मुंबई घडवण्याचा भाजपचा निर्धार जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

