मुख्यमंत्री उर्वरित

मुख्यमंत्री उर्वरित

Published on

‘ईडी’ची कारवाई भ्रष्‍टाचाराविराेधात!

‘ईडी कुणाच्या विरुद्ध आहे, उद्धव की राज ठाकरेंच्या? ईडी कुणाच्याही विराेधात नसून महापालिकेच्या अंतर्गत भ्रष्टाचाराविराेधात आहे आणि त्याविरोधातच कारवाई करत आहे. तुमच्या लोकांनी भ्रष्टाचार करायचा आणि आम्ही त्यांना राजकीय स्पेस द्यायची, हे देशाच्या कायद्यात बसत नाही, असे सांगत सक्तवसुली महासंचालनालयाबाबत विराेधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आराेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘सकाळ माध्यम समूहा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनमाेकळा संवाद साधला. ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
----------
‘मुंबईच्या माणसाला मुंबईपासून दूर स्वतःचे घर घ्यावे लागले त्यांच्यासाठी तुम्ही काय केले, किती इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले? मुंबईला पहिल्यांदा आलेल्या नितीन गडकरी यांनी ५५ पूल बांधले. वरळी सी-लिंक बांधला आणि त्यातूनच मुंबईच्या विकासाची सुरुवात झाली आणि त्यानंतर माझ्या, शिंदेंच्या काळात विकास झाला. आता माझ्या काळातही ही प्रक्रिया सुरू आहे,’ असा दावा फडणवीस यांनी केला.
पुण्यातील मुंबईतील मेट्रो प्रकल्प तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात मंजूर झाल्याचे अजित पवार म्हणाले हाेते. त्यावर फडणवीस म्हणाले की, ‘आमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडे दाखवण्यासारखे खूप काही आहे. आमच्याविरोधात लढतात त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे असे बाेलावे लागते. मनमोहनसिंग यांनी मेट्रो दिली होती तर सुरू का झाली नाही? सत्ता कुणाच्या हातात होती? देवेंद्र फडणवीस यांची वाट का पाहावी लागली. त्या मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कंपनीला महामेट्रोचे नाव देऊन काम करावे लागले.
----
विकासावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न
आमच्याविरोधात लढतात त्यांचा एकच प्रयत्न असताे. टोकाचे बोलून विकासावरील फोकस दुसरीकडे कसे वळेल, हे ते पाहतात. अजित पवार आमचे मित्र आहेत; पण पुण्यात आमचे विरोधक म्हणून निवडणुकीत उतरले आहेत. पुणे हे शहर अनेक वर्षे शरद पवार यांनी चालवले. तेव्‍हा त्यांचे शिलेदार अजित पवार होते. या शहराबाबतच्या प्रश्नांचे उत्तर अजित पवार यांनाही द्यावे लागेल. त्यामुळेच हे ठरवून बोलले जात आहे.
.....
काेविड काळातही आम्ही लाेकांत गेलाे...
मी मुख्यमंत्री असूनही दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रभागांतही सभा घेतल्या. कोविडच्या काळात आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांचा आवाज झालो. आता विरोधकांना महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी कार्यकर्ते आठवतात. इतर वेळी आठवत नाहीत.
---
९० टक्के उमेदवारी जुन्या कार्यकर्त्यांनाच
कोणत्याही महापालिका क्षेत्रात ९० टक्के उमेदवारी खऱ्या आणि पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना भाजपने दिली. ज्या ठिकाणी काही वर्षे आपण जिंकू शकलो नाही अशा ठिकाणी बाहेरून काही कार्यकर्ते आमच्या पक्षात आले तर त्यांचा विचार करावा लागताे. भाजपचा जनाधार आणि त्या व्यक्तीमुळे वाढलेला जनाधार यामुळे आम्ही निवडून येतो आणि तो भाग भाजपमय होतो.
----
‘त्यांचे’ कार्यकर्ते माेठे झाले नाहीत!
उद्धव ठाकरे असा आरोप करतात की, तुम्ही आमचा पक्ष फोडून आमची माणसे तीकडे नेतात. तुमच्या कार्यकर्त्यांना दिसत आहे की ते मोठे होण्यापेक्षा तुम्हीच मोठे होत आहात. तुमची प्रतिष्ठाच मोठी होत आहे. त्यामुळे तुमच्या कामावर तुमच्या वागण्यावर निराश होऊन काही कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. तसेच येणारे कार्यकर्तेही जुने हिंदुत्ववादी कार्यकर्तेच आहेत.
------
निवडणुकीनंतर पिढी तयार हाेते...
प्रत्येक निवडणुकीनंतर एक पिढी तयार होते. २०१७ नंतरसुद्धा अशी पिढी तयार झाली आहे, जिला २०२२मध्ये निवडणूक लढायची होती. २०२२ला निवडणूक न झाल्यानेही निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची नवी पिढी तयार झाली आहे. या दाेन्ही पिढ्या एकमेकांसमोर आल्याने आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. एका प्रभागात चार निष्ठावंत असतील तर त्यापैकी एकालाच उमेदवारी देता येणार आहे. ही स्थिती भाजपमध्येच नाही तर सर्वच पक्षांच्या बाबतीत झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आगोदर ५० ते ६० वर्षांचे नगरसेवक होते, परंतु आत्ताच्या काळात तेच २५ ते ३० वर्षांतील झाले आहेत. त्यामुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत काही कार्यकर्त्यांनी जे कृत्य केले ते पक्षाला भूषणावह नव्हते. त्यांची समजूत आम्ही काढली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी माेठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल, अशी परिस्थिती बदलून ती मोजक्याच ठिकाणी मर्यादित राहिली.

मग काेस्टल राेडचे काम का झाले नाही?
बीडीडी चाळीचा निर्णय मी घेतला. त्याचे टेंडर मी काढले. त्याचे भूमिपूजनही मी केले. बीडीडी चाळीचे काम चालू असताना त्यांनी पुन्हा भूमिपूजन केले. हेच त्यांचे श्रेय आहे. बीडीडीचे काम २०१८ला सुरू झालेले आहे. कोस्टल रोड ही माझी संकल्पना नव्हती, तर त्या वेळेस तुमची सत्ता होती तेव्हा रोडचे काम का झाले नाही. त्या कोस्टल रोडमधे उद्धवजींचे हेच श्रेय आहे की त्यांनी न सांगता कोणत्याही पदावर नसताना भूमिपूजन केले. जवळजवळ पाच केंद्रीय बैठका, त्यात येणाऱ्या अडचणी या सगळ्यांचा पाठपुरावा करून तो रोड मंजूर मी करून घेतला. त्या वेळेस ते आमच्या सोबत होते. त्यावर तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी सांगितले की त्यांनी भूमीपूजन केले तर मी उद्‍घाटन करेन, त्यानंतर त्याच्या प्रत्येक उद्‍घाटनाला मी होतो आणि एकनाथ शिंदेदेखील होते.
----
एमआयएमशी युती मान्य नाही!
मी दोन्ही गोष्टी स्पष्ट करतो. पहिल्यांदा अकाेटमध्ये एका छोट्या नगरपालिकेत स्थानिक स्तरावर युती करताना तेथील चार लोकांनी राजीनामा दिला व ते आघाडीत आले. ते आमच्यासाेबत आघाडीत आले. ते राष्ट्रवादी काॅँग्रेससोबत आले. प्रकाश बारसाखळे तेथील आमदार आहेत. ज्यांनी त्या ठिकाणाी याला मान्यता दिली; परंतु तो त्यांचा अधिकार नसून तो अधिकार रवींद्र चव्हाणांचा आहे. त्याबद्दल बारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीसही दिली गेली आहे. सत्तेसाठी समीकरणे जुळणे आम्हाला मान्य नाही. या माध्यमातून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो काहीही झाले तरीही एमआयएमशी युती मान्य नाही. काँग्रेसचे १२ लोक भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे काॅँग्रेसशी युतीचा प्रश्नच नाही. फायद्यासाठी युतीच्या घटना घडत असतील तर ते योग्य नाही. पक्षाच्या नेत्यांनाही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

सत्ता सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे साधन
मुळात हा आरोपच मूर्खपणाचा असून, राजकारणामध्ये आम्ही काय कंचे खेळायला तर आलो नाही. जे आमच्या समोर हारत आहेत त्यांना सत्ता मिळाली असती तर त्यांनी घेतली नसती का, ते प्रयत्न करत नाहीत का किंवा ते आमच्या समोर लढत नाहीत का? आम्हाला अधिक यश मिळते, कारण आमचे ध्येय निश्चित आहे. मोदींसारखे नेतृत्व आमच्याकडे आहे. अतिशय समर्पित कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. जनतेत राहून जनतेचे काम आम्ही करतो. विकासाचे माॅडल प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही करतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सत्तेचे समीकरण असते, ती सत्ता आपण कशासाठी वापरतो, ते ही महत्वाचे आहे. आमच्यासाठी सत्ता सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे उपकरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com