शिवतीर्थावर आज ठाकरे बंधूचे शक्तिप्रदर्शन

शिवतीर्थावर आज ठाकरे बंधूचे शक्तिप्रदर्शन

Published on

शिवतीर्थावर आज ठाकरे बंधूंचे शक्तिप्रदर्शन
२० वर्षांनंतर एकत्र; एकाच व्यासपीठावर २२७ उमेदवार

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) या तीन पक्षांची संयुक्त भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू मुंबईत एकत्र उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे या सभेकडे अवघ्या मुंबईचे लक्ष लागले आहे.

तिन्ही पक्षांकडून या सभेसाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.  यासाठी शिवतीर्थावर १०० फूट लांबीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून या व्यासपीठावर २२७ उमेदवार एकत्र दिसणार आहेत. सभेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही मैदान अपुरे पडेल, असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे.  शिवतीर्थ हे शिवसेनेचे शक्तिकेंद्र मानले जाते. दसरा मेळावा असो किंवा गुढीपाडव्याचा मनसे मेळावा, हे मैदान नेहमीच भरून सभा होतात; मात्र या वेळी परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन प्रमुख राजकीय शक्ती एकत्र येत असल्याने ही सभा केवळ परंपरेची नव्हे, तर सत्तेच्या समीकरणांना थेट आव्हान देणारी ठरणार आहे.

२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र
सभेचे मोठे आकर्षण म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे, ही केवळ भावनिक घडामोड नसून, पालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची रणनीतिक घटना मानली जात आहे. या घोषणेनंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, शिवतीर्थावर गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधूंच्या प्रचार सभेसाठी शिवतीर्थावर शंभर फूट लांबीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. प्रथमच एकाच व्यासपीठावर २२७ उमेदवार दिसणार आहेत. सभेसाठी एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून, लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
- साईनाथ दुर्गे, सचिव, शिवसेना (ठाकरे गट)

सभेचा मंच एकच; फक्त झेंडे अन् नेत्यांचे चेहरे बदलणार!
शिवाजी पार्कवर रविवारी (ता. ११) उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीची रणधुमाळी उडणार आहे. या दोन्ही सभांसाठी लागणारा १०० फुटांचा विस्तीर्ण मंच आणि मैदानातील ३५ हजार खुर्च्यांची व्यवस्था अगदी हुबेहूब तीच असणार आहे. दरम्यान, वेळेची कमतरता आणि सलग सभांमुळे या दोन्ही सभांसाठी एकाच कंत्राटदाराला काम दिल्याचे कळते आहे. रविवारी ठाकरेंची तोफ धडाडल्यानंतर काही तासांतच त्याच मंचाचा ताबा भाजप-महायुती घेणार आहे. यामध्ये या मंचाची रचना आणि खुर्च्यांची मांडणी तीच राहणार असली तरी, काही तासांत मंचाचा कायापालट केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com