मत मागायला येता, काम कधी करणार?

मत मागायला येता, काम कधी करणार?

Published on

मत मागायला येता, काम कधी करणार?
मुंबईकरांचा संतप्त सवाल; महापालिका रणधुमाळीत मतदार जागृत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मैदानात उभे असलेले नगरसेवक विविध आश्वासने देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र यातील अनेक उमेदवारांना जनतेचा रोषही सहन करावा लागत आहे. एकदा उमेदवाराला निवडून दिले की तो पुन्हा प्रभागाकडे, त्यातील समस्यांकडे ढुंकून पाहत नाहीत, असे नागरिकांचे म्‍हणणे आहे. त्यामुळे आधी समस्या, प्रश्न मार्गी लावा; मगच मतदानाची मागणी करा, असा पवित्रा अनेक ठिकाणी मतदारांनी घेतल्याचे दिसते.
जवळपास नऊ वर्षांनी मुंबईत महापालिका निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष प्रचाराला लागले आहेत. मुंबईतला मतदारही आपल्या हक्कासाठी जागृत असल्याचे चित्र आहे. नागरी समस्यांमध्ये वाढ होत असताना जवळपास साडेतीन वर्षे कुणीच वाली नव्हता, अशी भावना मतदारांची आहे. त्यामुळे अनेकांनी आधी काम मग मतं, असा पवित्रा घेतल्याचे चित्र दिसत आहे.
कांदिवली मतदारसंघात वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे सर्वसामान्यांना श्वसनाच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत प्रशासनाकडून स्थानिक पुढाऱ्यांकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे मतदान का करायचे, असा थेट सवाल व्यवसायाने सीए असलेल्या प्रीतेश विठलानी यांनी विचारला आहे.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील उघड्या गटाराचे सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे या प्रभागातून भाजपचे उमेदवार असलेल्या प्रतिभा शिंदे यांच्या पतीला लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. त्यांना अडवून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. यासाठी जाबही विचारला. पंतप्रधानांच्या नावावर आमचे मत घेतले जाते. त्यानंतर निवडून आलेले नगरसवेक पुन्हा प्रभागात फिरकत नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर समस्या तशाच राहतात, असा सूर या परिसरातील नागरिकांचा होता.
दुसरीकडे खारदांडा परिसरातील रहिवाशांना अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. अद्याप तिथे नियमित पाणीपुरवठा होत नाही. कामावर जाण्यास विलंब होण्याचे हे मुख्य कारण असल्याचे आशा महाडिक सांगतात. दुसरीकडे मलनिस्सारण, सांडपाण्याची मोठी समस्या या प्रभागात आहे. कोस्टल रोडच्या बांधकामामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांना त्याच दुर्गंधीत राहावे लागत असल्याचे विद्या माळी यांनी सांगितले.

मतदान का करायचे?
वांद्रे पश्चिम येथील वाहतूक कोंडी, रिक्षाचालकांची अरेरावी, पदपथावरील फेरीवाले, भिकारी, गर्दुल्ले, बांधकामामुळे होणारे वायू प्रदूषण अशा महत्त्वाच्या समस्यांमुळे स्थानिकांच्या मनात रोष आहे. फिरण्यासाठी, खेळण्यासाठी चांगली, स्वच्छ मैदाने, बगिचे नाहीत. हिल रोड परिसरात संध्याकाळी चालणे हा गुन्हा वाटतो, मग आम्ही मतदान का करायचे, असा प्रश्न स्थानिक ज्येष्ठ नागरिक रॉड्रिक्स यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com