भारतीय जनता पक्ष नव्हे, बलात्कार जनता पक्ष

भारतीय जनता पक्ष नव्हे, बलात्कार जनता पक्ष

Published on

भारतीय जनता पक्ष नव्हे, बलात्कार जनता पक्ष
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : आता देशातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी भारतीय जनता पक्षापासूनच देशाला वाचवण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आज भारतीय जनता पक्षाला लोक ‘बलात्कार जनता पक्ष’ असे संबोधत असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा शनिवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.
बदलापूरमध्ये एका बलात्काराच्या आरोपीला पक्षात सामावून घेण्याचा प्रकार समोर आला. हे सर्व भारतीय जनता पक्षाच्या कारभाराचा भाग आहे. उत्तराखंडमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला. त्यातील आरोपी भाजपचा आमदारच होता. दुसऱ्या ठिकाणी झालेल्या बलात्कारातही भाजपचे आमदारच होते. ऑलिंपिक पदक विजेत्या महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करणारादेखील भाजपचा खासदार होता. ज्या पक्षात बलात्काराच्या आरोपींना तिकीट दिले जाते, त्यांच्या पाठीशी उभे राहिले जाते, अशा पक्षाला जनता योग्य उत्तर देईल, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

भ्रष्टाचाराचे विषारी फळ
आज शिवसेना (शिंदे गट), अजित पवार गट आणि भाजप यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. हा पैसा चार मार्गाने त्यांच्याकडे येतो. पहिला मार्ग म्हणजे, शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार. समृद्धी महामार्गात दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्यातून आलेल्या पैशावरच ‘पन्नास खोके एकदम ओके’ हा नारा उभा राहिला. हे त्या भ्रष्टाचाराचे विषारी फळ आहे. दुसरा मार्ग म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे बदल्यांमधून पैसे घेतात, ते ‘देवा भाऊ’ नसून ‘टक्का भाऊ’ तसेच ‘मेवा भाऊ’ आहेत. तिसरा मार्ग म्हणजे, भूमाफियांमार्फत शासकीय जमिनी विकून पैसे कमावले जातात. त्यासाठीच गुंड आणि खंडणीखोर लोकांना पक्षात घेतले जाते. त्यांना तिकीट दिले जाते आणि तिथून पैसा उभा केला, असा आरोप त्यांनी केला. पैसे कमविण्याचा चौथा मार्ग म्हणजे अवैध व्यवसाय केला जात आहे. अमली पदार्थ व्यवसायातून पैसा कमविला जात आल्याचा आरोपदेखील सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.

सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र
अंबरनाथमध्ये १२ नगरसेवक आमच्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर ते भाजपसोबत गेले. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने अशा प्रवृत्तींविरोधात कारवाई केली आहे. आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही, विचार महत्त्वाचा आहे. चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवण्यापेक्षा आम्ही स्पष्ट भूमिका घेणे पसंत करतो. हे लोक विचारांनी एकत्र आलेले नाहीत. तर सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आल्याचा आरोपदेखील त्यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com