आधुनिक शेतीकडे विद्यार्थ्यांची वाटचाल
आधुनिक शेतीकडे विद्यार्थ्यांची वाटचाल
पाच एकर क्षेत्रावर ३० हजार भाजीपाला रोपांची लागवड
वाणगाव, ता. ११ (बातमीदार) : नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू कमी होत चालला आहे. जिल्ह्यातील शेतकरी हा आधुनिक विचारसरणीचा असला तरी मागील काही वर्षांपासून वातावरणात सातत्याने होणारा बदल, अवकाळी पावसाचे अनिश्चितेचे स्वरूप या सर्व समस्यांमुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. खर्च केलेले पैसे मिळत नसल्याने आर्थिक बाजू कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. आजचे कृषीचे विद्यार्थी हे उद्या भविष्यात शेतकरी आणि शेतीपूरक व्यावसायिक होणार आहेत. शेती आणि व्यवसाय करीत असताना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थीदशेतच अवगत व्हावे. शेती आणि व्यवसायात उत्तम पारंगत व्हावे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथील विद्यार्थ्यांनी जवळपास पाच एकर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे, असे प्राचार्य सोनालिका पाटील यांनी सांगितले आहे.
कृषी तंत्र विद्यालय, आसनगावच्या विद्यार्थ्यांनी नवीन फळझाडे लागवड, वेलवर्गीय भाज्या, कोबीवर्गीय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींसह शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांचीही लागवड केली आहे. कलिंगड लागवडीसह सूर्यफूल, फुलशेतीचाही समावेश त्यात आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान देऊन आत्मसात करण्यासाठी कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य सोनालिका पाटील, प्रा. प्रवीण भोये, प्रा. दिलीप पवार, प्रा. निशांत कासट यांची विशेष मेहनत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर
जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि तणांच्या बंदोबस्तासाठी आच्छादनाचा (मल्चिंग) वापर शेती पद्धतीमध्ये करण्यात आला आहे, तर सर्व पिकांना पाणी सम प्रमाणात उपलब्ध व्हावे, पाण्याची बचत व्हावी, या दृष्टिकोनातून ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीचा वापर करून पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
जवळपास पाच एकरावर तब्बल ३० हजार भाजीपाला रोपांची लागवड
सुधारित आणि संकरित जातींची भरघोस उत्पादन क्षमता असलेल्या तब्बल पाच एकर क्षेत्रावर ३० हजार भाजीपाला रोपांची लागवड करण्यात आली आहे. भविष्यात शेती आणि पूरक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
फर्टिगेशन प्रणालीचा वापर
ठिबक किंवा सूक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे पिकांना पाणी देतानाच पाण्यात विरघळणारी खते देतात, यालाच फर्टिगेशन असे म्हणतात. आधुनिक पद्धतीत खते थेट मुळांजवळ पोहोचतात, ज्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते, पाण्याची बचत होते आणि पिकांच्या गरजेनुसार पोषक तत्त्वे देता येतात.
विद्यार्थ्यांना भविष्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसायात सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थीदशेतच अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शेती आणि पूरक व्यवसायातून भविष्य घडवावे.
प्राचार्य सोनालिका पाटील, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

