उरणकरांची सुरक्षा ‘रामभरोसे’!
उरणकरांची सुरक्षा ‘रामभरोसे’!
पोर्ट लाइनवर रेल्वे प्रवाशांच्या जीवाला धोका; जीआरपी पोलिस ठाण्याचा अभाव
उरण, ता. ११ (वार्ताहर) : नेरूळ-बेलापूर ते उरण या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाला आता दोन वर्षे पूर्ण होत आली असली, तरी या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा आजही ‘रामभरोसे’ असल्याचे वास्तव समोर येत आहे. जेएनपीए बंदर आणि नवी मुंबईला जोडणारा हा मार्ग कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आला असला, तरी सुरक्षा व्यवस्थेअभावी प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच या मार्गावर १० नवीन लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या; मात्र केवळ गाड्यांची संख्या वाढवून रेल्वे प्रशासनाने आपले कर्तव्य पूर्ण केले का, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०२४ मध्ये या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. सध्या या रेल्वेमार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बामणडोंगरी येथे दररोज १५,८५४, खारकोपर ७,५७०, उरण ७,०६२, न्हावा-शेवा २,७६५, द्रोणागिरी २,६४४ तर शेमटीखार येथे ७७७ प्रवासी ये-जा करतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी असतानाही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या बाहेरील परिसरात एकाही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. काही मोजक्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म किंवा बेसमेंटमध्ये कॅमेरे असले, तरी स्थानकाबाहेरील ये-जा पूर्णपणे अनियंत्रित आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी, छेडछाड, गर्दुल्ल्यांचा वावर किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास त्याचे ठोस पुरावे मिळणे कठीण ठरत आहे.
..............
चोरीच्या घटनांमध्ये वाढ
उरण ते बेलापूर या संपूर्ण मार्गावर सध्या केवळ १४ आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) जवान तैनात आहेत; मात्र रेल्वे हद्दीतील गुन्हे नोंदवण्यासाठी अत्यावश्यक असलेले जीआरपी (शासकीय रेल्वे पोलिस) पोलिस ठाणे या मार्गावर अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे चोरी, मारामारी किंवा छेडछाडीची घटना घडल्यास प्रवाशांना तक्रार करण्यासाठी लांबच्या स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये जावे लागते. यामुळे स्थानिक पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत असून, तातडीच्या कारवाईतही विलंब होतो. रेल्वेसेवा सुरू होऊन दोन वर्षे पूर्ण होत असताना प्रशासनाने केवळ फेऱ्या वाढवण्यापुरते मर्यादित न राहता प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. उरण पोर्ट लाइनवरील सर्व स्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि तातडीने जीआरपी पोलिस ठाण्याची स्थापना करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

