सुगडावरही महागाईची संक्रात
मकरसंक्रातीच्या ''सुगड'' वर महागाईचे सावट
तिळगूळही महागले
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. मकर संक्रातीला प्रामुख्याने वापरात येणाऱ्या विविध प्रकारच्या सुगड (मातीचे छोटे हंडे) यांना विशेष महत्त्व असून त्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. राज्यातील इतर बाजारपेठांप्रमाणेच विक्रमगडच्या बाजारपेठाही अनेक प्रकारच्या वस्तूंनी गजबलेल्या असल्या तरी यंदा मात्र संक्रातीच्या सणावर महागाईचे सावट पसरल्याचे चित्र आहे.
सुवासिनी महिला आपल्या सौभाग्याचे रक्षण आणि आपापसातील मनाचा दुरावा दुर करण्यासाठी संक्रातीला एकमेकींना हळदी-कुंकवाचे वाण देतात. संक्रातीसाठी सुगडही आवश्यक असते. राज्यातील इतर भागांप्रमाणे विक्रमगडमध्येही सुगड पुजण्याची प्रथा परंपरेनुसार सुरू आहे. हुरडा, बोर, गाजर, शेंगदाणे, विविध फळे, उस व तिळगूळ सुगडमध्ये भरून त्या सुगडी, वाण म्हणून महिला एकमेकांना देत असतात. मात्र या सुगडीच्या किंमती यंदा गगणाला भिडल्या आहेत. बाजारात लहान आकाराची सुगड ८० ते ८५ रुपयांना पाच, तर मोठ्या आकाराच्या सुगड ९० ते १०० रुपयांचा पाच नग या भावाने विक्रीस उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस महाग होत चाललेली माती, सुगड बनवण्याची मजुरी, मेहनत, प्रवास खर्च इत्यादींच्या किंमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम सुगडच्या किंमतीवर झाला आहे. फक्त सुगडच नाही तर यंदा लाडूसाठी लागणारे तीळ व गुळ यांच्या किंमतीही वाढल्या आहेत. मागील वर्षी बाजारात १८० रुपये किलोने असलेले तिळ (पॉलिसचे तिळ) यंदा मात्र २०० रुपये पेक्षा जास्त दराने विकले जात आहेत. चिकीच्या गुळाबाबतही तिच अवस्था आहे. मागील वर्षी चिकीचे गुळ अंदाजे ७० ते ८० रुपये किलोने विकले जात होते, यावेळी मात्र त्याची किंमत १०० रुपये झाल्याची माहिती विक्रमगड येथील दुकानदार व्यापाऱ्यांनी दिली. तसेच तयार तिळाचे लाडूही बाजारात विक्रीस असून त्यांचे दर यंदा २०० ते २५० रुपये किलो आहेत. साखर फुटाणे, गाजर, बोर, हरभरा अशा वस्तूही चढ्या दराने बाजारात विक्रीस आहेत. असे असले तरी महागाईची तमा न बळगता, वर्षातून एकदा येणारा हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी आम्ही सर्व वस्तू नव्या दराने विकत घेत असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

