समस्यांच्या अंधारात दिवा

समस्यांच्या अंधारात दिवा

Published on

समस्यांच्या अंधारात दिवा
अनधिकृत बांधकामे, पाणीप्रश्न कळीचा मुद्दा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः ठाणे महापालिकेच्या सत्तासमीकरणाचे गणित जुळवण्यासाठी नेहमीच ‘अधिक’ची भूमिका बजावणारे दिवा शहर वर्षानुवर्षे समस्यांच्या अंधारात ‘विकास’ चाचपडत आहे. शहरातील मूलभूत प्रश्न आजही जैसे थे आहेत. पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडालेला असताना नागरिकांना किलोमीटरभर पाणी वाहून न्यावे लागते, ही वस्तुस्थिती कोणाच्या अजेंड्यावर आहे? दूषित पाणी, चोरीच्या कनेक्शनमुळे निर्माण झालेली विषमता, अपुरी आरोग्यसेवा दुर्लक्षित आहेत. पालिकेच्या शाळा, समाजमंदिरे, सभागृहे कागदावरच आहेत. फेरीवाले, अरुंद रस्ते आणि नियोजनशून्य पार्किंगमुळे दिवा वाहतूक कोंडीत अडकला आहे. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत हे सर्व मुद्दे कळीचे ठरले आहेत.

मुंबईत एकेकाळी राज्य करणारा मराठी कामगार वर्ग स्वस्त घराच्या शोधात दिव्यात स्थिरावला. सुरुवातीला भूमाफियांनी बांधलेल्या बैठ्या चाळींतून संसार करणारा हा बहुसंख्य कोकणी पट्टा ठरला; मात्र २००५च्या महाप्रलयानंतर येथील बैठ्या चाळींना जलसमाधी मिळाली आणि अनधिकृत बांधकांचे इमले चढू लागले. केवळ मराठीच नव्हे तर परराज्यातील लोकवस्तीही वाढू लागली. परिणामी, २० वर्षांत दिव्याची लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे सरकली आहे; मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे महापालिकेकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा या तोकड्या पडू लागल्या आहेत. वास्तविक ठाणे महापालिकेत सत्तेचे गणित जुळवताना दिवा शहर महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या निवडणुकीत येथून १५ नगरसेवक निवडून गेले होते.

यंदाही दिवा प्रभाग समितीतून प्रभाग क्रमांक २७, २८, ३३ मधून १२ तर २९ मधून तीन असे १५ नगरसेवक निवडून जाणार आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे येथे सर्वाधिक नगरसेवक आहेत. कल्याण लोकसभा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात दिवा येतो. या दोन्ही मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेना शिंदे गट करत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत दिव्याच्या विकासाच्या गप्पा अनेक झाल्या. काही योजना आणल्या गेल्या तर काही कागदावरच राहिल्या; पण या विकासकामांमध्ये आमचे हक्काचे पाणी कुठे आहे, रस्ता कुठे आहे, असा प्रश्न मतदार उघडपणे विचारू लागले आहेत.

पाण्यासाठी वणवण
दिवा शहरातील पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापनाचा अभाव हा आज सर्वात गंभीर प्रश्न ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कोणतेही दीर्घकालीन पाणी नियोजन झालेले नाही. अनेक भागांत नागरिकांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. नियमित पाणीटंचाई नागरिकांच्या पाचवीला पूजलेली आहे. नाल्यांमधून टाकलेल्या पाइपलाइन, गटारात तुटलेल्या जलवाहिन्या आणि त्यातून मिळणारे दूषित पाणी हे दिव्यातील वास्तव आहे. पाण्याच्या टाक्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली होती; मात्र सीआरझेड कायद्याचा अडसर सांगत प्रकल्प अर्धवट ठेवण्यात आले एका बाजूला चोरीच्या पाण्याचे टॅप घेणाऱ्यांना मुबलक पाणी मिळते, तर साबे, दिवा गाव यांसारख्या भागांत तुटपुंजा पुरवठा केला जातो. आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर २०२४ मध्ये पूर्ण केलेल्या जलवाहिनीतून पाणी देण्याचा प्रताप केला जात आहे.

अपुरी आरोग्यसेवा
आरोग्यसेवेच्या बाबतीतही दिवा शहराची अवस्था फारशी वेगळी नाही. महापालिकेने सुरू केलेले छोटे दवाखाने वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरे ठरत आहेत. संपूर्ण दिवा शहरात एकही सुसज्ज पालिकेचे रुग्णालय नाही, ही बाब गंभीर आहे. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने स्मशानभूमी अपुऱ्या पडत आहेत. डम्पिंग ग्राउंड बंद केल्याची घोषणा केली जाते; मात्र प्रत्यक्षात कचरा लपूनछपून टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी, आजार आणि आरोग्याचा धोका वाढत आहे.

बेकायदा शाळांचा सुळसुळाट
शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांकडे तर महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. पालिकेच्या शाळा दहावीपर्यंत सुरू कराव्यात, ही नागरिकांची जुनी मागणी आहे; मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी, बेकायदा शाळांचा या शहरात सुळसुळाट आहे. समाजमंदिरे, मोठी सभागृहे नसल्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दिवेकरांना आजही भटकंती करावी लागते आहे.

अनधिकृत बांधकामे
अनधिकृत बांधकामांचे शहर अशी दिव्याची ओळख बनली आहे. मध्यंतरी उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रभाग समितीतील अनेक इमारती पाडण्यात आल्या; मात्र तरीही आज शहरामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये अनधिकृत बांधकामे फोफावत आहेत. स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने ही बांधकामे सुरू असल्याचा आरोप अनेकवेळा झाला आहे. वाहतूक कोंडी ही दिवा शहराची ओळख बनत चालली आहे. अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांनी व्यापलेले रस्ते यामुळे दिवा अक्षरशः ठप्प होतो.

राजकीय परिस्थिती काय?
दिवा हा शिवसेनेचा गड समजला जातो. गेल्या निवडणुकीत येथील प्रभगा क्रमांक २७, २८च्या संपूर्ण पॅनेलवर शिवसेनेने विजय मिळवला होता. प्रभाग २९ मध्ये एक शिवसेनेचा तर दोन राष्ट्रवादीचा नगरसेवक निवडून आला होता. असे असले तरी गेल्यावेळी दिवेकर पर्याय शोधत असल्याचेही दिसून आले होते. युती तुटल्यामुळे या प्रभागांमध्ये भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. अवघ्या ५०० ते ८०० मतांसाठी त्यांचा पराभव झाला होता. या वेळी युती असली तरी हा मतदार भाजपचा परंपरागत नाही. या धर्तीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने समस्यांचा मुद्दा हातात घेऊन आक्रमक प्रचार करत आहे. त्यामुळे यंदा पर्याय म्हणून ते महाविकास आघाडीच्या बाजूने वळू शकतील, हा धोका सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com