घरकुलासाठी रोहा पंचायत समिती कार्यालयावर भाजपचा मोर्चा
घरकुलासाठी रोहा पंचायत समिती कार्यालयावर भाजपचा मोर्चा
रोहा, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील मालसई ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब व गरजू महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा, यासाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नागोठणे मंडळाचे अध्यक्ष महेश ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली रोहा पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. महिलांच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मालसई ग्रामपंचायतमधील अनेक पात्र महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेपासून अद्याप वंचित ठेवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर या महिलांनी थेट आपल्या व्यथा महेश ठाकुर यांच्यासमोर मांडल्या. अनेक वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांच्या तक्रारी ऐकून ठाकुर यांनी तातडीने प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवार (ता. ८) रोजी रोहा पंचायत समिती कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला. गोरगरीब महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्ते व महिलांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चानंतर महेश ठाकुर यांनी रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान मालसई ग्रामपंचायतमधील पात्र लाभार्थी महिलांची यादी, प्रलंबित प्रकरणे व प्रक्रियेतील अडथळे यावर सविस्तर विचारविनिमय झाला. यावेळी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर पात्र महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देत घरकुल मंजूर करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले. या आंदोलनात पंचायत समितीचे लवटे, मालसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका, भाजप मालसई शक्तिकेंद्र प्रमुख तसेच भाजप सोशल मीडिया अध्यक्ष अनिल खंडागळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

