एस. व्ही. रोडवरील पाईपांचे ढिगारे; अपघाताचा धोका वाढला

एस. व्ही. रोडवरील पाईपांचे ढिगारे; अपघाताचा धोका वाढला

Published on

एस. व्ही. रोडवरील पाइपांचे ढिगारे; अपघाताचा धोका वाढला
कांदिवली, ता. १२ (बातमीदार) : कांदिवली पश्चिमेतील प्रचंड वाहतूक असलेल्या स्वामी विवेकानंद (एस. व्ही.) रोडवर ठिकठिकाणी भूमिगत कामासाठी वापरण्यात येणारे पाइप ठेवण्यात आल्याने वाहनचालक, प्रवासी व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पाइपांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एस. व्ही. रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. या मार्गाचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले असून काँक्रीटीकरणाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सुमारे एक फूट रुंद व २० फूट लांबीचे चार ते पाच पाइप गेल्या दोन आठवड्यांपासून पदपथालगत, रस्त्यावर, वळणांवर, बसथांब्याजवळ तसेच चौकात टाकण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ तसेच अग्निशमन दलाच्या केंद्राच्या परिसरातही पाइपांचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन वाहने बाहेर काढताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत आर दक्षिण विभागाचे दुय्यम अभियंता दिनेश बिडवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
दरम्यान, महा ई-सेवा केंद्राचे प्रमुख नामदेव बनसोडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की पालिकेने महत्त्वाच्या ठिकाणांना वगळून इतर मोकळ्या जागेत पाइप नीटनेटके ठेवावेत. बसथांबे, वळण व चौकात पाइप ठेवू नयेत. गर्दीच्या वेळेत यामुळे गंभीर अपघात घडू शकतो. अशा कोणत्याही दुर्घटनेस पालिका अधिकारी व संबंधित ठेकेदार जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com