आंबा बागांमध्ये मोहरानी
विक्रमगड तालुक्यात आंबा मोहरला
निसर्ग साथ देतोय, शेतकऱ्यांची आशा पल्लवित
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या बोचऱ्या थंडीमुळे आंबा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. येथे हापूससह स्थानिक आंबा जातींना मोठ्या प्रमाणात मोहर आला आहे. हिरव्या बागांमध्ये डोकावणाऱ्या पांढऱ्या मोहराकडे पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचे हास्य फुलले आहे.
विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे, आलोंडे, मलवाडा, ओंदे, खुडेद, आपटी म्हसरोली, केव, चिंचघर परिसर तसेच इतर दुर्गम गाव-पाड्यांमध्ये आंबा बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस, अचानक तापमान वाढ आणि बदलते हवामान याचा फटका आंबा पिकाला बसला होता. यंदा मात्र डिसेंबरच्या मध्यापासून जाणवणारी थंडी, सकाळी पडणारे दव आणि कोरडे हवामान यामुळे झाडांना आवश्यक विश्रांती मिळाली असून, मोहरासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. आंबा पिकासाठी थंडी हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. योग्य प्रमाणात थंडी पडल्यास झाडांवर एकसमान व मजबूत मोहर येतो. याचाच अनुभव सध्या शेतकरी घेत आहेत. अनेक बागांमध्ये पहिल्या टप्प्यातील मोहर फुटला असून, पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मोहर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तुडतुडे, भुरी आणि करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याचे चित्र आंबा बागायतदार सांगत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी सांगतात की, मोहर पाहूनच वर्ष कसे जाईल, याचा अंदाज येतो. त्यामुळे बागेत उमलणारा प्रत्येक मोहर शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
कृषी विभागाचा सल्ला :
कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोहर अवस्थेत रासायनिक फवारण्यांचा अतिरेक टाळावा, गरज असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना कराव्यात, तसेच हवामान बदलावर सातत्याने लक्ष ठेवावे, असे आवाहन केले आहे. थंडीचे प्रमाण असेच टिकून राहिल्यास विक्रमगड तालुक्यात यंदा आंबा हंगाम भरघोस जाण्याची शक्यता असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा मोठा आधार मिळणार असल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया :
खूप दिवसांनी अशी सलग थंडी जाणवत आहे. त्यामुळे आमच्या बागेत मोहर एकसमान दिसत आहे. यंदा निसर्ग साथ देईल, अशी आशा आहे.
- शिवम मेहता
(आंबा बागायतदार, विक्रमगड)
प्रतिक्रिया :
थंडीमुळे झाडांना दमछाक न होता विश्रांती मिळाली. आता फक्त अचानक पाऊस किंवा उष्णता वाढू नये, हीच अपेक्षा.
-विजय सांबरे
(आंबा बागायतदार, विक्रमगड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

