

पालिकेच्या शहर लेखा व्यवस्थापकाची तात्काळ कार्यमुक्ती
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील हलगर्जीपणा भोवला
टिटवाळा, ता. १२ (वार्ताहर) : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आर्थिक गोंधळ आणि प्रशासकीय दिशाभूल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर लेखा व्यवस्थापक रितेश जाधव यांच्यावर ठपका ठेवत आयुक्त डॉ. अभिनव गोयल यांनी त्यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचा निधी खर्च करण्यासाठी प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅन (PIP) सादर करणे आवश्यक होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही रितेश जाधव यांना हा आराखडा सादर करता आला नाही. परिणामी, आरोग्य उपक्रमांसाठी आलेला मोठा निधी अखर्चित राहिला. तर, केंद्र शासनाच्या आदेशानुसार १० ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या ‘एसएनए स्पर्श’ प्रणालीअंतर्गत नागरी आरोग्य संस्थांकडील अखर्चित शिल्लक रक्कम शून्य करणे बंधनकारक होते. मात्र, रक्कम शिल्लक असतानाही जाधव यांनी अखर्चित शून्य असल्याची माहिती वरिष्ठांना दिली. या आधारावर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासनाकडे पत्र पाठवण्यात आले.
यामुळे केंद्र शासनाने थेट महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अभिनव गोयल यांनी यापूर्वी जाधव यांना कामात सुधारणा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती, मात्र त्यात सुधारणा न झाल्याने अखेर २६ डिसेंबर २०२५ पासून त्यांना पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यांच्या पदाचा कार्यभार लेखापाल ऋषिकेश पन्हाळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नेमका घोटाळा काय?
केंद्र सरकारच्या आदेशानुसार १० ऑक्टोबर २०२५ पासून ‘स्टेट नोडल अकाउंट’ ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली. या बदलापूर्वी जुन्या खात्यातील शिल्लक निधी खर्च करणे किंवा तो शासनाकडे वर्ग करणे बंधनकारक होते. मात्र, महापालिका प्रशासनाने १ नोव्हेंबर रोजी सर्व निधी खर्च झाला आहे, असे प्रमाणपत्र सरकारला सादर केले. परंतु, प्रत्यक्ष तपासणीत निधी शिल्लक असल्याचे आढळल्याने सरकारने साडेचार लाखांचा निधी स्वतःहून परत घेतला. नवीन प्रणाली लागू झालेली असतानाही २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात जुन्या खात्यातून परस्पर व्यवहार करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.