अलिबागच्या ताज्या मासळीवर खवय्यांचा ताव
अलिबागच्या ताज्या मासळीवर खवय्यांचा ताव
पर्यटन वाढीमुळे मासळी बाजारात वाढली गर्दी
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) ः मुंबई व पुण्यापासून जवळ असल्याने अलिबाग हे कोकणातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण आणि ऐतिहासिक वारसा यासोबतच अलिबागची आणखी एक मोठी ओळख म्हणजे येथे मिळणारी ताजी आणि दर्जेदार मासळी. त्यामुळेच दर आठवड्याच्या शेवटी तसेच सुट्ट्यांच्या काळात अलिबागच्या मासळी बाजारात खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सध्या अलिबागच्या मासळी मार्केटमध्ये हलवा, सुरमई, बांगडा, पापलेट, कोळंबी, खेकडे, मांदेली, ओला जवळा, घोळ अशा विविध प्रकारच्या ताज्या मासळीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. अलिबाग व परिसरातील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. पहाटे समुद्रातून आणलेली ताजी मासळी थेट बाजारात विक्रीसाठी दाखल होत असल्याने तिच्या ताजेपणामुळे ग्राहकांचा कल या बाजाराकडे अधिक आहे. अलिबागला येणारे पर्यटक केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर येथील ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठीही आवर्जून बाजारात भेट देतात. स्थानिक ग्राहकांबरोबरच मुंबई, पुणे तसेच गुजरातमधूनही व्यापारी व ग्राहक अलिबागची मासळी खरेदीसाठी येत असल्याचे मासळी विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. विशेषतः सुरमई, पापलेट, हलवा, बांगडा यांसारख्या मोठ्या व चवदार मासळीला पर्यटकांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक हॉटेल, होमस्टे आणि काॅटेज व्यावसायिकही थेट बाजारातून मासळी खरेदी करत आहेत. एकूणच पर्यटन वाढीचा थेट फायदा अलिबागच्या मासळी व्यवसायाला होत असून, ताज्या मासळीमुळे अलिबागची ओळख आणखी भक्कम होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
............
सुक्या मासळीलाही चांगली मागणी
ताजी मासळी उपलब्ध नसल्यास अनेक ग्राहक सुक्या मासळीवर समाधान मानतात. सध्या सुकट, बोंबिल, सोडे, वाकटी, जवळा अशा सुक्या मासळीला देखील मोठी मागणी असून, विशेषतः शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सुकी मासळी खरेदी करत आहेत.
...............
सध्याचे अंदाजे दर (रुपयांत):
१) मध्यम कोळंबी – १५० ते २०० रुपये (वाटा)
२) पापलेट (लहान) – ५०० रुपये (८ नग)
३) पापलेट (मध्यम) – ८०० रुपये (४ नग)
४) बांगडा (मोठा) – १००० रुपये
५) सुरमई (मोठी) – १००० ते १२०० रुपये
६) हलवा – ८०० ते १००० रुपये
७) मांदेली – ५० ते १०० रुपये (वाटा)
८) ओला जवळा – १०० रुपये (वाटा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

