पालिका निवडणुकीत पॅनल प्रचारात विसंवाद

पालिका निवडणुकीत पॅनल प्रचारात विसंवाद

Published on

पालिका निवडणुकीत पॅनल प्रचारात विसंवाद
उमेदवारांमध्ये ताळमेळाचा अभाव; पक्षाच्या आदेशामुळे नाइलाजाने प्रचार
वाशी, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या पॅनलमध्येच अंतर्गत विसंवाद उफाळून आला असून प्रचारात एकसूत्रतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्यांना स्थानिक पातळीवर विरोध केला जात होता, त्यांनाच पक्षाने तिकीट दिल्याने तेच अधिकृत पॅनल उमेदवार झाले आहेत. इच्छा नसतानाही “पक्षाचा आदेश” म्हणून संपूर्ण पॅनलचा प्रचार करण्याची वेळ अनेक उमेदवारांवर आली आहे. मात्र मनोमिलन न झाल्याने प्रचारात कुठेही ताळमेळ दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
यंदा बहुतांश पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटप केल्याने अनेक प्रभागांमध्ये पॅनलमधील उमेदवार कोण आहेत, हे शेवटच्या टप्प्यापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. परिणामी, पक्षाशी फारसा संबंध नसलेले, नवखे तसेच दुसऱ्या पक्षातून आलेले उमेदवार ऐनवेळी पॅनलमध्ये लादले गेल्याची भावना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. विशेषतः एसटी व अन्य आरक्षित जागांवरील अनेक उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचार सुरू होऊन आठवडा उलटला तरी पॅनलमधील चारही उमेदवार स्वतंत्रपणे प्रचार करत असल्याचे चित्र आहे. एकाच भागात वारंवार प्रचार, तर काही उमेदवार केवळ स्वतःच्या परिसरापुरतेच मर्यादित राहिले आहेत. पॅनलचे संयुक्त नियोजन, सामूहिक रॅली, सभांचे वेळापत्रक यांचा अभाव असल्याने प्रचार विस्कळीत झाला आहे. माहितीपत्रकेही स्वतंत्रपणे छापण्यात आली असून अनेक ठिकाणी केवळ एका उमेदवाराचेच छायाचित्र झळकत आहे. काही प्रभागांत तर इतर उमेदवारांना डावलून एकाच उमेदवाराने जाहिरात फलक लावल्याचे दिसून येत आहे. या विस्कळीतेचा थेट परिणाम मतदारांवर होत असून पॅनलमध्येच एकजूट नाही, तर कारभार कसा चालणार?, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. वारंवार बैठका घेऊनही उमेदवारांमध्ये समन्वय होत नसल्याने पक्षाचे पदाधिकारीही वैतागले असून, प्रचार यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
............
बॉक्स : कार्यकर्त्यांची पळवापळवी
प्रमुख पक्षांचे काही उमेदवार प्रचारात झोकून देऊन काम करत असले तरी अनेक उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची कमतरता आहे. घरातील सदस्य, मित्रमंडळी यांच्या मदतीने प्रचार करावा लागत आहे. परिणामी, कार्यकर्त्यांसाठी पळवापळवी सुरू असून, त्यांना जोडण्यासाठी वेगवेगळे तंत्र वापरले जात आहे.
............
प्रचार खर्चावरूनही ‘तू तू मैं मैं’
पॅनलचा प्रचार खर्च चारही उमेदवारांनी समान प्रमाणात करायचा असतो. मात्र प्रत्यक्षात कोण किती खर्च करणार, यावरून वाद निर्माण होत आहेत. “मीच का खर्च करायचा?” या प्रश्नामुळे पॅनलप्रमुखांवर आर्थिक भार येत असून तेच वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच पॅनलमधील उमेदवार असूनही प्रचारात परस्परविरोधी सूर दिसून येत आहे. रिक्षा, टेम्पो, एलईडी व्हॅनवर केवळ स्वतःचीच कामे व छायाचित्रे दाखवली जात आहेत. संयुक्त प्रचाराचा अभाव ठळकपणे जाणवत आहे. १५ जानेवारीला मतदान असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र अद्याप पॅनलमध्ये समन्वय साधला गेलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com