खरं सांग भाऊ, मतदान कुणाला करू?

खरं सांग भाऊ, मतदान कुणाला करू?

Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १२ : अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठावंत समजले जाणारे नेते व माजी लोकप्रतिनिधी सत्तेच्या संभाव्य समीकरणांच्या हव्यासापोटी; तसेच विकासकामांचा वाटा पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या घडामोडींमुळे अनेक वर्षांपासून एकाच पक्षाशी आणि एकाच झेंड्याशी एकनिष्ठ राहिलेले मतदार मात्र संभ्रमात सापडले आहेत. खरं सांग भाऊ, मतदान कुणाला करू? असा सवाल ते ओळखी-पाळखीच्या मंडळींकडे करू लागले आहेत.
उल्हासनगर महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली होती. २०२२मध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिका बरखास्त करण्यात आली आणि त्यानंतर तब्बल चार वर्षे निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागली. या चार वर्षांच्या काळात राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडल्या. अखंड शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिवसेनेतील २२ नगरसेवकांनी त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला. उरलेले तीन नगरसेवक महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये दाखल झाले.
दुसरीकडे, एकेकाळी कलानी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे राजेश वधारिया यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून काँग्रेसने निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. २०१७च्या निवडणुकीत ठसा उमटवणारे टीओकेचे सर्वेसर्वा ओमी कलानी यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच भाजपचा महापौर विराजमान झाला होता. त्यानंतर राज्यात मविआ स्थापन झाल्यावर ओमी कलानी यांनी आघाडीला साथ देत अडीच वर्षांनंतर झालेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेला निवडून येण्यात मोलाचे योगदान दिले होते. तसेच खासदारकीच्या निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ‘दोस्ती का गठबंधन’ करत त्यांनी आपली राजकीय भूमिका अधोरेखित केली होती.
याच शिवसेना-टीओके-साई पक्षाच्या ‘दोस्ती का गठबंधन’ने यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकत्र येत भाजपशी थेट टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान अनेक निष्ठावंत व प्रस्थापित नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांचे झेंडे बदलले आहेत. परिणामी, मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, नेमके कोणाला मत द्यावे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे.

कोण ‘मुकद्दर का सिकंदर’?
पक्ष बदलले असले, तरी ज्या उमेदवारांनी दीर्घकाळ मतदारांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे, त्यांच्या प्रचार रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणात जनाधार दिसून येत आहे. त्यामुळे पक्षांतर केलेले नगरसेवक आणि बडे पदाधिकारी यंदाच्या निवडणुकीत ‘मुकद्दर का सिकंदर’ ठरणार की मतदार निष्ठेला कौल देणार, याचा फैसला १६ जानेवारीला जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com