पालिका निवडणुकीसाठी ६४ हजार कर्मचारी

पालिका निवडणुकीसाठी ६४ हजार कर्मचारी

Published on

पालिका निवडणुकीसाठी ६४ हजार कर्मचारी
२२ हजार पोलिस तैनात; प्रथमच ‘पाडू’ संयंत्राचा वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी ६४ हजार ३७५ कर्मचारी-अधिकारी, चार हजार ५०० स्वयंसेवकांची आणि २२ हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी प्रथमच ‘पाडू’ (प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट) ही पर्यायी मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. ही १४० यंत्रे महापालिकेला उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी साेमवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकीसाठी दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात १,७०० उमेदवार आहेत. निवडणुकीची संपूर्ण तयारी पालिकेकडून पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर लागणारी यंत्रणा, सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ८० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियुक्त केलेले स्वयंसेवक मतदानाच्या दिवशी मतदार रांगा लावणे, गर्दी व्यवस्थापन, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे आदी जबाबदारी असणार आहे, असे गगराणी यांनी सांगितले.


प्रत्येक प्रभागात महिलांच्या व्यवस्थापनाखालील किमान एक गुलाबी सखी मतदान केंद्र असेल. अशा केंद्रांत पोलिस व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील. मतदान केंद्रावर मतदाराने मोबाईल न्यायचा नसून, नेलाच तर तो स्वीचऑफ करावा. सुरक्षिततेच्या दृष्टीने २२ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून मतदान प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शकरितीने पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे गगराणी यांनी सांगितले.
...............
काय आहेत ‘पाडू’ संयंत्रे?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच मेसर्स भारत इलेक्ट्रॅानिक्स लिमिटेड (बेल) बंगळूरच्या या कंपनीची ‘एम३ए’ (पाडू) ही पर्यायी मतदान संयंत्रे प्रथमच उपलब्ध करण्यात आली आहेत. मतदान यंत्राद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून करणे आवश्यक आहे. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर बंगळूरच्या या कंपनीने विकसित केलेल्या ‘पाडू’चा वापर करून मतमोजणी पार पाडता येते.
................
अशी आहे तयारी
कंट्रोल युनिट : २० हजार
बॅलेट युनिट : २५ हजार
...............
उमेदवार : १,७००
पुरुष : ८२२
महिला : ८७८
......
मतदान केंद्रे ठिकाणे : २,२७८
मतदान केंद्रे : १०,२३१
......
मतदार संख्या
एकूण मतदार : १,०३,४४,३१५
पुरुष : ५५,१६,७०७
महिला : ४८,२६,५०९
इतर : १,०९९
............
मतदान केंद्रांवरील सुविधा
मतदान कक्षात पिण्याचे पाणी, मतदारांसाठी प्रतीक्षागृह, शेड, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा रॅम्प व व्हीलचेअर, मानक मतदान कक्ष, आवश्यक दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. दिव्‍यांग मतदार, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान कक्षात प्रवेश देताना प्राधान्य देण्यात येणार आहे.
...................
विभागनिहाय आचारसंहिता कक्ष आणि पथके
प्रत्येक प्रशासकीय विभागानुसार विभागीय सहाय्यक आयुक्तांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता पथक कार्यरत आहेत. यात स्थिर पाळत पथक निश्चित ठिकाणी तैनात करण्यात आले असून, रोख रक्कम व दारूची बेकायदा वाहतूक, शस्त्रसाठ्याची वाहतूक यावर नजर ठेवली जाते.
..............

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com