विकासाकडे नव्हे, तर विनाशाकडे वाटचाल!

विकासाकडे नव्हे, तर विनाशाकडे वाटचाल!

Published on

विकासाकडे नव्हे, तर विनाशाकडे वाटचाल!
ठाकरे बंधूंचा ठाण्यात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : राज्याची सध्या विकासाकडे नव्हे, तर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. सत्ताधारी आणि उद्योगपती मिळून महाराष्ट्र गिळायला निघाले आहेत. ठाण्यासह मुंबईलगतच्या शहरांचे अस्तित्वच संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केला. ठाण्यातील गडकरी रंगायतनशेजारील चौकात आयोजित सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.
देश आता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नव्हे, तर उद्योगपती चालवणार आहेत. उद्योगपतींच्या हातातच संपूर्ण सत्ता दिली आहे. ठाण्यात अदाणी सिमेंटचा कारखाना टाकणार आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढणार आहे. उद्योगपतींना जमिनी देणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत की नाही, आमची युती ही जागावाटपासाठी नाही, तर मराठी माणसाला जागे करण्यासाठी झाली आहे. मराठी आमची आई आहे, हिंदी मावशी आहे. आईवर अन्याय करणाऱ्यांना आम्ही सडेतोड उत्तर देऊ. मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवी सत्ताधाऱ्यांनी ७२ हजार कोटींवर आणल्या. मुंबईवर तब्बल तीन लाख कोटींचे कर्ज लादण्यात आले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर सुरू आहे. पाच-पाच हजारांना मते विकली जात आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी कोटींच्या ऑफर्स दिल्या जात आहे. मतांसाठी इतका पैसा वाटला जातोय; पण हा पैसा येतो कुठून, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली स्वाभिमान गहाण टाकला जात आहे. विकास महत्त्वाचा आहे; पण त्याआधी ठाण्याची ओळख, मराठी ठसा आणि स्वाभिमान टिकवणे गरजेचे आहे. विकास केला असेल, तर निवडणुकीत पैसे वाटण्याची गरजच का पडते? बदलापूर बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला नगरसेवकपद देण्याची हिंमत कशी होते, असा प्रश्न उपस्थित केला. तक्रारी करूनही पोलिस हतबल दिसतात. हे कोणते राज्य आहे, असा सवाल त्यांनी केला. सत्तेचा हव्यास नाही. शहर विकले जाऊ नये, हीच भूमिका आहे. विकासाच्या नावाखाली ठाणे गहाण पडू देऊ नका. आधी स्वाभिमान जपा, मराठी ठसा टिकवा आणि ठाणे वाचवा, असे आवाहन राज यांनी केले.
----
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांचे डान्सबार, त्यांच्या अवैध खाणी चालतात, आम्ही केले तर गुन्हे. पूर्वीचा भाजप राष्ट्र प्रथम म्हणायचा, आता गुंड प्रथम झाले आहेत. पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना भाजपने सामावून घेतले.
- उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख
---
मी उद्योगपतींच्या विरोधात नाही; पण एकाच व्यक्तीला विमानतळे, बंदरे, वीज प्रकल्प दिले जात असतील, तर भविष्यात देश काही मोजक्यांच्या हातात जाण्याचा धोका आहे. मुंबई थेट मिळत नाही म्हणून आजूबाजूची शहरे गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- राज ठाकरे, मनसेप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com